सेंच्युरियन : भारतीय कर्णधार विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये वर्चस्व निर्माण करणारा असू शकतो. पण जर त्याला योग्य मार्गदर्शक मिळाला तर कर्णधार म्हणून तो अधिक यशस्वी ठरेल, असे मत दक्षिण आफ्रिकेचे माजी प्रशिक्षक रे जेनिंग्स यांनी व्यक्त केले.
जेनिंग्स कोहलीची वाटचाल अंडर-१९ च्या दिवसांपासून बघत आहेत. जेनिंग्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे प्रशिक्षक होते.
जेनिंग्स म्हणाले, ‘माझ्या मते एक कर्णधार म्हणून तो अद्याप सर्वोत्तम नाही. भारतीय क्रिकेट प्रणालीला कोहलीला सुधारावे लागेल. महेंद्रसिंह धोनीच्या काळानंतर कोहलीयुगात बराच बदल झाला आहे. धोनी शांतचित्त तर कोहली त्याच्या एकदम विपरीत. कोहली ड्रेसिंग रुममध्ये दहशत निर्माण करणारा असू शकतो. कधी कधी त्याच्या संघसहकाºयांना कोहली नेमका कुठला? असा प्रश्नही पडत असेल.’
जेनिंग्सच्या मते, कोहली युवा खेळाडूंमध्ये भीती निर्माण करू शकतो आणि त्यामुळे एक चांगला मेंटर वेळेची गरज आहे.
जेनिंग्स म्हणाले, ‘ड्रेसिंग रुममध्ये भीतीचे वातावरण असू शकते. संघातील युवा खेळाडूंची संख्या लक्षात घेता असे वातावरण योग्य नाही. त्यामुळे कोहलीला चांगला कर्णधार करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अशा व्यक्तीचा शोध घ्यावा जो कोहलीमध्ये सुधारणा घडवेल व त्याच्यावर छाप सोडेल. कोहली अनुभवातून परिपक्व होईल. तो आता आहे त्या तुलनेत आक्रमक राहणार नाही. पण, त्यापूर्वी ड्रेसिंग रुममधील भीती घालवण्यासाठी कोहलीला योग्य मार्गदर्शक मिळणे आवश्यक आहे.’
जेनिंग्स पुढे म्हणाले,‘कोहली समजदार व भावनिक असल्यामुळे बदल स्वीकारेल. तो सर्वोत्तम होण्यास उत्सुक आहे आणि जगातील सर्वोत्तम खेळाडू होण्याची त्याच्यात क्षमता आहे, तरी त्याला मार्गदर्शकाची गरज आहे.’
डर्बनमध्ये कोहलीने ३३ वे वन-डे शतक झळकावले. त्याआधी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत तो सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज आहे.
जेनिंग्स पुढे म्हणाले, ‘कोहलीने या वयात ३३ वन-डे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहेत. त्याला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्याच्याकडे अद्याप किमान १० वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे आगामी ३-४ वर्षांत तो हा विक्रम नोंदवेल. माझ्या मते कुठल्याही फलंदाजासाठी ३२ हे सर्वोत्तम वय असते. विराट अद्याप ३२ वर्षांचा नाही. त्यामुळे तुम्ही ३३ मध्ये आणखी काही शतके जोडू शकता.’
अंडर-१९ विश्वकप २००८ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक राहिलेले जेनिंग्स म्हणाले, ‘ज्यावेळी भारताने (२००८) विराटच्या नेतृत्वाखाली अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकावले होते त्या वेळी मी दक्षिण आफ्रिका अंडर-१९ संघाचा प्रशिक्षक होतो. त्या वेळी विराट त्याच्या वयोगटातील खेळाडूंमध्ये फलंदाजीत अव्वल असल्याचे मला वाटले होते. मी ज्यांना खेळताना बघितले त्यात फिरकीपटूंविरुद्ध विराट सर्वोत्तम खेळाडू आहे. तो सर डॉन ब्रॅडमनपेक्षा सरस आहे काय? याची मला कल्पना नाही, पण सध्या तो जगातील अव्वल दोन फलंदाजांमध्ये सामील आहे.’ (वृत्तसंस्था)
>अनुकूल खेळपट्टी तयार करण्याची रणनीती आफ्रिकेवर उलटू शकते
दक्षिण आफ्रिकेचे माजी प्रशिक्षक रे जेनिंग्स यांनी भारताविरुद्ध अलीकडेच संपलेल्या कसोटी मालिकेत संघ व्यवस्थापनाने यजमान संघाला अनुकूल खेळपट्ट्या तयार करण्याच्या रणनीतीवर टीका केली. ही रणनीती जवळजवळ यजमानांवर उलटली होती, असे त्यांनी म्हटले आहे.
जेनिंग्स म्हणाले,‘दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत यजमान संघाला अनुकूल खेळपट्ट्या तयार करण्याचा प्रयत्न केला. ही रणनीती उलटण्याची शक्यता होती. यजमान संघ मालिका गमावण्याची शक्यता होती. भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमण शानदार आहे. त्यामुळे अशा खेळपट्ट्या सहायक ठरल्या नसत्या. वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरणाºया खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंनाही लाभ मिळतो.
१० वर्षांपूर्वी भारतीय संघात वेगवान गोलंदाजांची वानवा होती. आता त्यांच्याकडे अनेक वेगवान गोलंदाज आहेत. अंडर-१९ स्तरापासून त्यांच्याकडे किमान १३५ किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. काही वर्षांपूर्वी भारतीय गोलंदाजांची ही कमाल मर्यादा होती.’
>डिव्हिलियर्स व ड्युप्लेसिसनंतर दुखापतग्रस्त डीकॉक मालिकेतून ‘आउट’
केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉक दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीमध्ये सामील झाला. भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेतील उर्वरित चार सामने व टी-२० मालिकेतून डिकॉक ‘आऊट’ झाला आहे.
रविवारी सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसºया वन-डे सामन्यात डीकॉकच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली. त्यातून सावरण्यासाठी त्याला दोन ते चार आठवडे लागतील. डीकॉकपूर्वी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स व कर्णधार फाफ ड्युप्लेसिस बोटाच्या दुखापतीमुळे वन-डे मालिकेतून बाहेर झाले आहेत. आफ्रिका क्रिकेट बोर्डाने वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी डीकॉकच्या स्थानी अन्य खेळाडूच्या नावाची घोषणा केलेली नाही.