Join us  

स्लेजिंगची विराट कोहलीला कुठली अडचण नाही, ऑस्ट्रेलियन संघाला दिला सल्ला

steve waugh : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी १७ डिसेंबरपासून ॲडिलेड ओव्हलमध्ये दिवस-रात्र लढतीने सुरू होईळ. त्यानंतर मेलबोर्न (२६ डिसेंबरपासून), सिडनी (७ जानेवारीपासून) आणि ब्रिस्बेन (१५ जानेवारीपासून) सामने खेळले जातील.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2020 5:43 AM

Open in App

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने आपल्या संघाला भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या आगामी मालिकेसाठी विराट कोहलीसोबत शाब्दिक युद्ध सुरू न करण्याचा सल्ला दिला आहे.  कारण  त्यामुळे  कोहली व त्याच्या संघाला चांगली कामगिरी  करण्याची  अतिरिक्त प्रेरणा मिळू शकते, असेही वॉ म्हणाला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी १७ डिसेंबरपासून ॲडिलेड ओव्हलमध्ये दिवस-रात्र लढतीने सुरू होईळ. त्यानंतर मेलबोर्न (२६ डिसेंबरपासून), सिडनी (७ जानेवारीपासून) आणि ब्रिस्बेन (१५ जानेवारीपासून) सामने खेळले जातील. दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेने होईल. वॉ म्हणाला, ‘स्लेजिंगची विराट कोहलीला कुठली अडचण नाही. महान खेळाडूंवर त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे ते टाळण्याचा प्रयत्न करा.’ स्लेजिंगमुळे त्याला धावा फटकावण्याची अतिरिक्त प्रेरणा मिळेल. त्यामुळे त्याच्याविरुद्ध स्लेजिंगच्या अस्त्राचा वापर न करणे योग्य ठरेल. ’ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार टीम पेन व त्याच्या संघाने भारतीय संघाच्या गेल्या दौऱ्यात ही चूक केली होती आणि भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका २-१ ने जिंकली.  वॉ म्हणाला, ‘कोहली जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. तो मालिकेतील सर्वोत्तम फलंदाज होण्यास इच्छुक असतो. गेल्यावेळी भारतात स्टीव्ह स्मिथ व तो आमने-सामने होते. त्यात स्मिथने तीन शतके ठोकली होती. हेसुद्धा यावेळी कोहलीच्या डोक्यात असेल. तो अधिक धावा फटकावण्यास प्रयत्नशील असेल.’ वॉ पुढे म्हणाला, ‘खेळाडू म्हणून कोहली सध्या अधिक नियंत्रित आहे आणि भारताला विदेशात विजय मिळवून देण्यास आतुर आहे. तो पूर्वीच्या तुलनेत अधिक परिपक्व झाला आहे. 

बायोबबलमध्ये राहणे मानसिकदृष्ट्या खडतर - सातत्याने ‌‘बायोबबल’मध्ये राहणे क्रिकेटपटूंसाठी मानसिकदृष्ट्या कठीण आहे आणि कोरोना महामारीदरम्यान जैविक रूपाने सुरक्षित माहोलमध्ये खेळण्यासाठी कुठल्या दौऱ्याच्या कालावधीचा विचार करावा लागेल, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. - भारतीय संघ आयपीएलनंतर लगेच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. तेथे एका ‌‌‘बायोबबल’मधून दुसऱ्यामध्ये जावे लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या यूट्यूब चॅनलसोबत बोलताना कोहली म्हणाला, ‘हे सातत्याने होते आहे. आमच्याकडे शानदार संघ आहे. हे कठीण भासत नाही. ‌‘बायोबबल’मध्ये असलेले सर्व लोक शानदार आहेत. माहोल शानदार आहे. त्यामुळे आम्ही सोबत खेळण्याचा व ‌‘बायोबबल’मध्ये राहण्याचा आनंद घेत आहोत. पण सातत्याने हेच घडत राहिले तर कठीण होते.’- आयपीएलमध्ये खेळत असलेले क्रिकेटपटू ऑगस्टपासून यूएईत आहेत. त्यानंतर भारतीय संघात समावेश असलेले सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. त्यामुळे बाहेरच्या जगासोबत प्रदीर्घकाळ त्यांचा संबंध येणार नाही. मानसिक थकव्यावरही लक्ष द्यावे लागले. 

टॅग्स :विराट कोहली