Join us  

Only Virat: कॅप्टन कोहलीचा भीमपराक्रम, सलग चार वर्ष गाजवलं क्रिकेटविश्व

विराटनं 2019 या कॅलेंडर वर्षात कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 अशा तीनही प्रकारात मिळून एकूण 2455 धावा चोपल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 10:07 AM

Open in App

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा व निर्णायक सामना चुरशीचा झाला. टीम इंडियाच्या तुलनेनं कागदावर कमकुवत दिसणाऱ्या वेस्ट इंडिज संघांन चांगली लढत दिली. कटक येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं 5 बाद 315 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतानं 48.4 षटकांत 6 बाद 316 धावा करून विजय मिळवला. या विजयासह भारतानं मालिका 2-1 अशी खिशात घातली. 

या सामन्यात भारताच्या आघाडीच्या तीनही फलंदाजांनी दमदार खेळ केला. रोहित शर्मा ( 63), लोकेश राहुल ( 77) आणि कर्णधार विराट कोहली ( 85) यांच्या फटकेबाजीनंतर रवींद्र जडेजा ( 39*) आणि  शार्दूल ठाकूर ( 17*) यांच्या फिनिशर भूमिकेनं टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, विंडीजकडून निकोलस पूरण ( 89), कर्णधार किरॉन पोलार्ड ( 74*), शे होप ( 42), रोस्टन चेस ( 38), शिमरोन हेटमायर ( 37) यांनी दमदार फटकेबाजी केली.

या सामन्यात सुरुवातीला रोहितनं कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमात विराटला मागे टाकले. पण, कोहलीनं 81चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीनं 85 धावा करून एक असा विक्रम नावावर केला, तो आजपर्यंत एकाही जागतिक फलंदाजाला जमलेला नाही. कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित 1490 धावांसह आघाडीवर आहे, तर कोहली 1377 धावांसह  दुसऱ्या स्थानावर आहे. कसोटीत मात्र विराट 612 धावांसह दहाव्या स्थानावर आहे. ट्वेंटी-20तही कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट नवव्या स्थानावर आहे. त्यानं 466 धावा चोपल्या आहेत.

विराटनं 2019 या कॅलेंडर वर्षात कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 अशा तीनही प्रकारात मिळून एकूण 2455 धावा चोपल्या. 44 आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्यानं 64.60 च्या सरासरीनं धावा करताना 7 शतकं व 14 अर्धशतकं ठोकली.  नाबाद 254 ही त्याची या वर्षातील सर्वोत्तम खेळी ठरली. विराटनं सलग चार वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात 2000+ धावा केल्या आहेत. विराटनं 2016 मध्ये 2595 धावा, 2017 मध्ये 2818 धावा आणि 2018 मध्ये 2735 धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग चार कॅलेंडर वर्षांत 2000+ धावा करणारा तो जगातला पहिला फलंदाज आहे. 

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्माभारत विरुद्ध वेस्ट इंडिज