भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एका शिखरावर झेप घेतली. एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय म्हणजे या दोन्ही फॉरमॅटचा समावेश असलेल्या 'लिमिटेड ओव्हर' क्रिकेटमध्ये कोहली आता सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर यांचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील आपल्या नाबाद ७४ धावांच्या खेळीदरम्यान विराटने लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये १८ हजार ४४३ (एकदिवसीय- १४,२५५ धावा + टी२०- ४,१८८ धावा) धावा पूर्ण केल्या. तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या नावावर १८ हजार ४३६ धावांची (एकदिवसीय- १८ हजार ४२६ धावा + टी२०- १० धावा) नोंद आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर कुमार संगकारा, चौथ्या स्थानावर रोहित शर्मा, पाचव्या स्थानावर महिला जयवर्धने आणि सहाव्या स्थानावर रिकी पॉन्टिंग आहे.
वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा:
| क्रमांक | खेळाडू | धावा |
| १ | विराट कोहली | १८ हजार ४४३* |
| २ | सचिन तेंडुलकर | १८ हजार ४३६ |
| ३ | कुमार संगकारा | १५ हजार ६१६ |
| ४ | रोहित शर्मा | १५ हजार ५८९* |
| ५ | महेला जयवर्धने | १४ हजार १४३ |
| ६ | रिकी पॉन्टिंग | १४ हजार १०५ |
कोहलीने यापूर्वीच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कुमार संगकाराला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले. आता लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला मागे टाकून अव्वल स्थान मिळवल्यामुळे, क्रिकेटच्या मर्यादीत षटकाच्या फॉरमेटमध्ये पुन्हा एकदा कोहलीचे वर्चस्व पाहायला मिळाले.