Join us  

ऑस्ट्रेलियाचा मुकाबला करण्यासाठी 'विराट'सेना सज्ज! खरंच की काय?

भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा मायभूमीत पराक्रम गाजवला. वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटीतही धूळ चारत 'विराट'सेनेने ऑस्ट्रेलियाला धोक्याचा इशाराच दिला आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 15, 2018 10:50 AM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा सराव होण्यासाठी बीसीसीआयने वेस्ट इंडिज संघाला बोलावले.

भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा मायभूमीत पराक्रम गाजवला. वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटीतही धूळ चारत 'विराट'सेनेने ऑस्ट्रेलियाला धोक्याचा इशाराच दिला आहे. इंग्लंडमधील लाजीरवाण्या कामगिरीनंतर अदृष्य झालेले शास्त्री गुरुजी विंडीजविरुद्धच्या यशानंतर पुन्हा माध्यमांसमोर आले. या अभूतपूर्व यशाने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या मनगटात जणू हत्तीचे बळ आले आहे. ते आता ऑस्ट्रेलियात जाऊन यजमानांना हरवण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत.

या दौऱ्यातून पृथ्वी शॉच्या रूपाने सलामीचा एक चांगला पर्याय भारताला मिळाला. रिषभ पंतने सातत्यपूर्ण कामगिरीने आपले स्थान पक्के केले आहे. मात्र, संघात आपले स्थान कुणी पक्के समजू नये, ही भावना खेळाडूंच्या मनात कायम राहावी याची शास्त्री गुरुजीनी काळजी घेतली आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पंत की वृद्धिमान सहा याचा निर्णय लवकर घेतला जाईल, असे सुचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण कामगिरी करुनही पंतच्या मनात धाकधूक आहेच. 

उपकर्णधार अजिंक्य रहाणेला गवसलेला सूर ही त्याच्या आणि संघाच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. गेले अनेक सामने अजिंक्यकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याच्यावर मधल्याफळीची अधिक जबाबदारी असणार आहे. उमेश यादवने आपल्या कामगिरीने निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले. पण संघात भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जस्प्रीत बुमराह हे गोलंदाज असताना त्याला अंतिम अकरात संधी मिळणे अवघड आहे.

इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटसाठी वापरला जाणारा चेंडू भारतातही वापरावा, अशी विराटची मागणी. पण या दोन्ही देशांतील वातावरण आणि खेळपट्टी यांचा अभ्यास केल्यास ती मागणी निरर्थक आहे, हे कळून चुकते. ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक पाहिल्यास भारताला दोनच सराव सामने खेळायला मिळत आहेत. त्यामुळे निराशाजनक कामगिरी झाल्यास पुन्हा सराव सामन्याची सबब पुढे केली जाऊ शकते. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा सराव होण्यासाठी बीसीसीआयने वेस्ट इंडिज (बलाढ्य) संघाला बोलावले. ऑस्ट्रेलियाचा दौरा करण्यापूर्वी संघातील काही बाजूंची ( सलामीची जोडी, अतिरिक्त जलदगती गोलंदाज, फलंदाजांचा हरवलेला फॉर्म) दुरुस्ती करण्यासाठी हा दौरा होता. तीन-तीन ( ५-५) दिवसांच्या या कसोटी मालिकेत त्यांना कितपत यश आले हे आगामी काळात कळेलच. पण तुर्तास तरी मालिका विजयामुळे 'विराट'सेनेचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. पण भारतीय संघ खरचं ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या मायभूमीत सामना करण्यासाठी सज्ज आहे का?

टॅग्स :विराट कोहलीपृथ्वी शॉउमेश कुलकर्णी