Join us

दक्षिण आफ्रिकेत "विराट" पराक्रम!

इतिहासाच्या पानांमध्ये रोज नवनवे आध्याय लिहिले जात असतात. असाच एक आध्याय विराट कोहलीच्या पराक्रमी संघाने दक्षिण आफ्रिकेत लिहिलाय. दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याची किमया विराटसेनेने साधलीय.

By balkrishna.parab | Updated: February 17, 2018 04:02 IST

Open in App

इतिहासाच्या पानांमध्ये रोज नवनवे आध्याय लिहिले जात असतात. असाच एक आध्याय विराट कोहलीच्या पराक्रमी संघाने दक्षिण आफ्रिकेत लिहिलाय. दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याची किमया विराटसेनेने साधलीय. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात साध्यासुध्या नव्हे तर सुवर्णाक्षरांनी नोंद करावी अशी ही कामगिरी. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण सर्वच क्षेत्रात यजमान  दक्षिण आफ्रिकेला चारीमुंड्या चीत करत भारतीय संघाने हा मालिका विजय साकारलाय.दक्षिण आफ्रिका दौरा म्हटला की भारतीय संघाची दाणादाण ठरलेली. एखाद दुसरी कसोटी आणि दोन चार वनडेमधील विजयांचा अपवाद वगळता भारतीय संघाचे आफ्रिकेच्या मैदानावरील स्कोअर बुक पराभवांनीच भरलेले. त्यामुळे यंदाच्या दौऱ्यात नवा इतिहास रचण्याचे आव्हान भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीसमोर होते. पण पहिल्या दोन कसोटी सामन्यात पराभूत झाल्यावर विराटसेना नवा इतिहास रचण्याऐवजी पराभवाच्या मालिकेचीच पुनरावृत्ती करणार की काय, अशी भीती वाटू लागली होती. पण वाँडरर्सवर झालेल्या तिसऱ्या कसोटीमधील जिगरबाज खेळाने भारतीय संघात नवा आत्मविश्वास जागवला. त्या सामन्यातील विराटची कप्तानी आणि मिळालेला विजय या दौऱ्यातील टर्निंग पॉईंट ठरला. मग मात्र भारतीय संघाने मागे वळून पाहिले नाही. विराट कोहलीची फलंदाजी आणि युझवेंद्र चहल व कुलदीप यादवची गोलंदाजी दोन्ही संघांमध्ये जमीन अस्मानाचे अंतर निर्माण करून गेली. विराट कोहली ग्रेट फलंदाज आहे यात आता शंका राहिलेली नाही. या मालिकेतही त्याने यजमान गोलंदाजांना आपल्यातील फलंदाजाचे विराटरूपदर्शन घडवले. तिसऱ्या आणि सहाव्या सामन्यात त्याने एकहाती दक्षिण आफ्रिकेचे आक्रमण मोडून काढले. सहा सामने, तीन वेळा नाबाद, तीन शतके, एक अर्धशतक आणि साडेपाचशेहून अधिक धावा ही आकडेवारी त्याच्या कामगिरीविषयी सारे काही सांगून जाणारी.केवळ विराटच नाही, तर आघाडीच्या फळीतील शिखर धवन, अजिंक्य रहाणे यांनीही अपेक्षेप्रमाणे फलंदाजी केली. समोर मॉर्कल, रबाडा मॉरिस आणि एन्डिंगीसारखे गोलंदाज असतानाही भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीला झोडपून काढले. 

एकीकडे फलंदाज आपली कामगिरी चोख बजावत असताना दुसरीकडे फिरकी गोलंदाजांनीही आपला हिसका दाखवला. एका लढतीचा अपवाद वगळता संपूर्ण मालिकेत आफ्रिकन फलंदाजांची चहल-कुलदीपच्या फिरकीसमोर फे फे उडाली. तर भुवनेश्वर, बुमरा आणि पांड्याच्या माऱ्यासमोर आधीच हैराण झालेल्या यजमान फलंदाजांवर मुंबईकर शार्दुल ठाकूरने अखेरचा आघात केला. या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ वनडे क्रमवारीत अव्वलस्थानी होता. त्यात घरच्या मैदानात खेळत असल्याने परिस्थितीही त्यांना अनुकूल होती. पण या कशाचाही परिणाम आपल्यावर होऊ न देता भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला चारीमुंड्या चीत केले. त्यामुळे सहा सामन्यांच्या मालिकेत ५-१ अशा फरकाने मिळवलेला हा विजय अतुलनीय असा आहे. येत्या काळात परदेशी खेळपट्ट्यांवर खेळताना हा विजय भारतीय संघाला कायम प्रेरणा देत राहील. तर क्रिकेटप्रेमींच्याही दीर्घकाळ स्मरणात राहील.

टॅग्स :क्रिकेट