Join us  

सचिनपुत्र अर्जुनचा पराक्रम पाहून कांबळी 'काका' भारावला; म्हणाला... 

युवा कसोटी सामन्यातील अर्जुनच्या यशानं सचिनचा जिगरी दोस्त - म्हणजेच अर्जुनचा 'काका' विनोद कांबळी भावुक झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 6:25 PM

Open in App

बेंगळुरूः क्रिकेटमधील विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा चिरंजीव अर्जुन तेंडुलकरने आज आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात देधडक कामगिरी करून क्रिकेटवर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या युवा कसोटी सामन्यात अर्जुननं १२व्या चेंडूवर पहिली विकेट घेतली आणि आपले इरादे बुलंद असल्याचं दाखवून दिलं. त्याच्या या यशानं सचिनचा जिगरी दोस्त - म्हणजेच अर्जुनचा 'काका' विनोद कांबळी भावुक झाला आहे आणि ट्विटरवरून आपल्या पुतण्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. 

'अर्जुनची पहिली विकेट पाहून डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अर्जुनला मोठं होताना आणि मेहनत करताना पाहिलंय. त्यामुळे हा क्षण आनंददायी आहे. पण ही फक्त सुरुवात आहे. असंच उदंड यश तुला मिळत राहो', अशा भावना विनोद कांबळीनं व्यक्त केल्या आहेत. क्रिकेट कारकिर्दीतील पहिल्या विकेटचा मनसोक्त आनंद घेण्याचा सल्लाही कांबळी काकानं दिलाय. 

१९ वर्षांखालील कसोटी सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा कर्णधार अनुज रावतने पहिली ओव्हर टाकण्यासाठी चेंडू अर्जुनच्या हाती दिला आणि सचिनपुत्राने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. आपल्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्यानं लंकेचा सलामीवीर कामिल मिश्राला पायचित पकडलं आणि मैदानावर एकच जल्लोष झाला. 

सचिन तेंडुलकरला 'क्रिकेटचा देव' मानलं जातं. त्यामुळे त्याचा वारसा पुढे नेण्याची मोठीच जबाबदारी अर्जुन तेंडुलकरवर आहे. त्यानं गोलंदाज म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि सचिननंही त्याला प्रोत्साहन दिलं. त्या जोरावर अर्जुननं शालेय क्रिकेटमध्ये, तसंच मुंबईच्या आणि भारताच्या अंडर-१४ संघात चमकदार कामगिरी करून दाखवली होती. ती पाहूनच भारताच्या अंडर-१९ संघात त्याची निवड करण्यात आली आहे. आता हे मैदानही तो गाजवणार का, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरविनोद कांबळीसचिन तेंडूलकरक्रिकेट