Vinod Kambli Health Update : भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी याच्यावर सध्या ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी प्रकृती खालावल्यामुळं त्याला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. क्रिकेटर उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी क्रिकेटरच्या तब्येतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे.
विनोद कांबळी यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर विवेक दिवेदी यांनी सांगितले. मी त्यांची सगळी तपासणी केली असून त्यांचे सगळे रिपोर्ट चेक केले आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. इतर चाचण्यांपैकी त्यांचे आता एम. आर. आय (ब्रेन) करण्यात येणार आहे. या रिपोर्ट्सनुसार त्यांच्यावर पुढील उपचार काय करावे लागतील ते ठरवले जाईल.
ब्लड प्रेशर नॉर्मल, चमक भरल्याची तक्रारही झाली दूर
शुक्रवार पर्यंत त्यांना आयसीयू मधून इतर वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं जाईल. सगळे रिपोर्ट व्यवस्थित आले तर रविवार पर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. सध्या मॉनिटरिंग करावे लागत असल्यामुळे त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले आहे, असे दिवेदी यांनी सांगितलं. ब्लड प्रेशर नॉर्मल असून त्यांना चमक भरल्याचा जो त्रास जाणवत होता ती तक्रारही दूर झाली आहे.
सातत्याने आरोग्याच्या समस्येमुळं हैराण झालाय क्रिकेटर
विनोद कांबळी हा सध्या वेगवेगळ्या आजारानं त्रस्त आहे. शनिवारी प्रकृती खालावल्याने क्रिकेटरला ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो उपचाराला चांगला प्रतिसाद देतोय. यातून तो लवकर बरा व्हावा, अशीच प्रार्थना त्याचा चाहतावर्ग करत आहे.