Join us  

विजय हजारे ते विराट कोहली: भारतीय कर्णधारांचे यशाचे टप्पे

भारताचे नावाप्रमाणेच पहिले कसोटी विजयी कर्णधार विजय हजारे यांच्यापासून आता पहिल्यांदाच 28 वा विजय नोंदवणारा विराट कोहली येथवरच्या यशाच्या टप्प्यांचा प्रवास मनोरंजक आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 5:48 PM

Open in App

ललित झांबरे : वेस्ट इंडिजला क्लिन स्विप देताना विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आता 28 विजय आहेत. यासह महेंद्रसिंग धोनीचा 27 कसोटी विजयांचा विक्रम त्याने मागे टाकलाय. भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासात कुण्या कर्णधाराच्या नावावर प्रथमच 28 वा विजय लागला आहे. 

भारताचे नावाप्रमाणेच पहिले कसोटी विजयी कर्णधार विजय हजारे यांच्यापासून आता पहिल्यांदाच 28 वा विजय नोंदवणारा विराट कोहली येथवरच्या यशाच्या टप्प्यांचा प्रवास मनोरंजक आहे. 

विजय हजारे हे भारताचे पहिले विजयी कर्णधार. फेब्रुवारी 1952 मध्ये चेन्नईला (त्यावेळेचे मद्रास)त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडला मात दिली होती. 

लाला अमरनाथ हे दोन कसोटी जिंकणारे पहिले भारतीय कर्णधार ठरले. त्यांच्या नेतृत्वातील दुसरा विजय भारताने नोव्हेंबर 1952 मध्ये मुंबईत पाकिस्तानवर मिळवला. दोन कसोटी विजयांच्या लाला अमरनाथ यांच्या यशाची पॉली उम्रीगर व नरी काँट्रॅक्टर यांनी पुनरावृत्ती केली. पण तिसरा विजय ते नोंदवू शकले नाहीत. 

मन्सूर अली खान पतौडी हे तीन कसोटी सामने जिंकणारे पहिले भारतीय कर्णधार ठरले. त्यांनी तिसऱ्या विजयापासून नवव्या विजयापर्यंत ही यशाची मालिका वाढवली. पतौडी यांच्या नेतृत्वात तिसरा विजय भारताने फेब्रुवारी 1968 मध्ये न्यूझीलंविरुध्द ड्युनेडीन येथे नोंदवला. जानेवारी 1975 मध्ये त्यांच्या नेतृत्वातील नववा विजय भारताने जानेवारी 1975 मध्ये नोंदवला. 

पतौडी यांचा नऊ कसोटी विजयांचा विक्रम मोहम्मद अझहरूद्दीनने नोव्हेंबर 1994 मध्ये नोंदवला. त्यावेळी भारताने लखनऊ येथे श्रीलंकेला मात दिली होती. कर्णधार म्हणून,अझहरचा हा दहावा कसोटी विजय होता. ही विजयांची संख्या अझहरने पुढे 14 पर्यंत वाढवली.

भारतासाठी 15 कसोटी विजय मिळवणारा पहिला कर्णधार ठरला तो सौरव गांगुली. एप्रिल 2014 मध्ये रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुध्द त्याने हा टप्पा गाठला. सौरवने आपल्या नेतृत्वातील कसोटी विजयांची संख्या 21 वर पोहचवली. 

सौरवचा विक्रम मोडून 22 व्या विजयाचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय कर्णधार म्हणजे महेंद्रसिंग धोनी. मार्च 2013 मध्ये हैदराबाद येथे ऑस्ट्रेलियाला मात देत धोनीने हा टप्पा गाठला आणि पुढे आपल्या नेतृत्वातील विजयांची संख्या 27 पर्यंत वाढवली. 

धोनीच्या या 27 विजयांचा हा विक्रम आता विराट कोहलीने मोडला आहे. वेस्ट इंडिजविरुध्द किंग्स्ट्न कसोटीतील भारताचा दणदणीत विजय हा विराट कोहलीचा कर्णधार म्हणून 28 वा विजय आहे. एवढे विजय मिळविणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार आहे. 

 

भारतीय कर्णधारांचे यशाचे टप्पे 

विजय       कर्णधार          विरुध्द          वर्ष  

पहिला    विजय हजारे       इंग्लंड     फेब्रु. 1952

दुसरा      लाला अमरनाथ   पाक      नोव्हे.1952

नववा      एमएके पतौडी    विंडीज   जाने. 1975

14 वा     अझहरूद्दीन       पाक       फेब्रु. 1999

21 वा    सौरव गांगुली      झिम्बाब्वे  सप्टे. 2005

27 वा    एम.एस. धोनी     इंग्लंड      जुलै 2014

28 वा    विराट कोहली     विंडीज     सप्टे. 2019

टॅग्स :विराट कोहली