नवी दिल्ली : मयंक अग्रवाल आणि कर्णधार करुण नायर यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर कर्नाटकने आज येथे विजय हजारे करंडकाच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघावर ९ गडी राखून सहज मात करीत अंतिम फेरी गाठली.
महाराष्ट्राला ४४.३ षटकांत १६0 धावांत गुंडाळल्यानंतर कर्नाटकने विजयी लक्ष्य ३0.३ षटकांत १ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून सलामीवीर मयंक अग्रवालने ८६ चेंडूंत ८१ आणि कर्णधार करुण नायरने ९0 चेंडूंत नाबाद ७0 धावा केल्या. या दोघांनी सलामीसाठी २८.२ षटकांत १५५ धावांची भागीदारी करताना कर्नाटकचा विजय निश्चित केला.
या सत्रात जबरदस्त सूर गवसलेल्या मयंक अग्रवाल हा एकदिवसीय विजय हजारे करंडकाच्या एकाच हंगामात सर्वाधिक ६३३ धावा फटकावणारा खेळाडूदेखील बनला. सुरेख कव्हर ड्राईव्ह आणि आॅन ड्राईव्ह मारणाºया मयंकने त्याच्या खेळीत ८ चौकार व एक षटकार मारला. मयंकने दिव्यांग हिंगणेकर याला कव्हर ड्राईव्ह मारताना त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि स्पर्धेतील ६00 धावाही पूर्ण केल्या. त्याचप्रमाणे करुणने एक धाव घेत अर्धशतक पूर्ण केले. त्याआधी कर्नाटकच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर महाराष्ट्राचा संघ ४३.३ षटकांत १६0 धावांत गारद झाला. महाराष्ट्राकडून श्रीकांत मुंढेने ७७ चेंडूंत ५ चौकारांसह ५0 धावा केल्या. नौशाद शेखने ४२, अंकित बावणे याने १८ व कर्णधार राहुल त्रिपाठी १६ धावांवर बाद झाला. महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली आणि जबरदस्त फार्मात असणारा ऋतुराज गायकवाडला ए. पी. कृष्णा याने एका धावेवर त्रिफळाबाद केले.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : ४४.३ षटकांत सर्वबाद १६0. (श्रीकांत मुंडे ५0, नौशाद शेख ४२, अंकित बावणे १८, राहुल त्रिपाठी १६. एम. पी. कृष्णा २/२६, गौतम के. ३/२६).
कर्नाटक : ३0.३ षटकात १ बाद १६४. (मयंक अग्रवाल ८१, करुण नायर ७0, सत्यजित बच्छाव १/३२).