कोलकाता : विदर्भाने कर्नाटकवर पाच धावांनी थरारक विजयाची नोंद करीत गुरुवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली. विदर्भाचा पाच दिवसांचा अंतिम सामना इंदूरच्या होळकर मैदानावर २९ डिसेंबरपासून दिल्लीविरुद्ध रंगणार आहे.
१९८ धावांचे साधारण लक्ष्य गाठणारा कर्नाटक संघ ५९.१ षटकांत १९२ धावांत बाद झाला. वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने भेदक मारा करीत ६८ धावांत सात गडी बाद केले. विदर्भाच्या ऐतिहासिक विजयाची मुहूर्तमेढ रोवणाºया गुरबानीने या सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरीसह एकूण १२ गडी बाद केले. पहिल्या डावांत त्याने ९४ धावा देत पाच गडी बाद केले होते. सिद्धेश नेरळने दोन आणि उमेश यादवने एक बळी घेतला. काल चौथ्या दिवसअखेर कर्नाटक ७ बाद १११ असा संघर्ष करीत होता. गुरबानीचा मारा त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरला. पाचव्या दिवशी गुरबानीनेच तिन्ही बळी घेतले.
कर्णधार विनय कुमार (३६) याने गुरबानीच्या चेंडूवर यष्टिरक्षक अक्षय वाडकरकडे झेल दिला. विजयाचा विश्वास निर्माण करणारा अभिमन्यू मिथुन (३३) याने सरवटेकडे झेल दिला. श्रेयस गोपाल २४ धावांवर नाबाद राहिला. त्याआधी विदर्भाने पहिल्या डावात ६१.४ षटकांत सर्वबाद १८५ धावा केल्या. कर्नाटकने १००.५ षटकांत सर्व बाद ३०१ धावांपर्यंत मजल गाठून आघाडी घेताच सामना विदर्भाच्या हातून जातो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. विदर्भाने दुसºया डावात ३१३ धावा उभारून कर्नाटकला अवघ्या १९२ धावांत गुंडाळून ६० वर्षांत पहिल्यांदा
रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत
धडक दिली. (वृत्तसंस्था)
प्रशिक्षकांची प्रतिक्रिया पाहून
डोळ्यांत अश्रू आले : रजनीश गुरबानी
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील खडूस प्रशिक्षक या नावाने ओळखले जाणारे चंद्रकांत पंडित यांची प्रतिक्रिया पाहून विदर्भचा गोलंदाज रजनीश गुरबानी याच्या डोळ्यांत अश्रू आले होते. विदर्भने अंतिम फेरी गाठल्याने पंडित खूश झाले होते. उपांत्य फेरीच्या सामन्यात गुरबानी याने दुसºया डावात सात गडी बाद केले. गुरबानी याने सांगितले की, प्रशिक्षकांचा प्रफुल्लित चेहरा पाहून मी अश्रू आवरू शकलो नाही. ’
उमेश यादवबाबत बोलताना गुरबानी म्हणाला की, ‘उमेश यादव याच्या उपस्थितीने मला मोठी मदत मिळाली. त्याच्यासोबत गोलंदाजी सुरू करणे माझ्यासाठी मोठे स्वप्न होते. तो एका बाजूने गोलंदाजी करत होता. ते पाहणे खूपच आनंददायी होते. उमेश माझ्यासाठी आदर्श आहे आणि तो माझा आवडता गोलंदाज आहे.’
विदर्भाची कामगिरी -
याआधी विदर्भाने दोनदा उपांत्य फेरी गाठली होती. २००२-०३ आणि २०११-१२ या सत्रात दोनदा विदर्भ संघ उपांत्य फेरीत पोहोचला; पण स्पर्धा जिंकू शकला नव्हता. याशिवाय संघाने दोनदा उपांत्यपूर्व फेरीतही धडक दिली होती. १९७०-७१ मध्ये तसेच १९९५-९६ या सत्रात विदर्भ संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला होता.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ (पहिला डाव: १८५ आणि ३१३ धावा), कर्नाटक (पहिला डाव ३०१ आणि ५९.१ षटकांत सर्वबाद १९२ धावा, रवी समर्थ २४, करुण नायजर ३०, सी. एम. गौतम २४, विनय कुमार ३६, श्रेयस गोपाल नाबाद २४, अभिमन्यू मिथुन ३३. गोलंदाजी: रजनीश गुरबानी
३२.१ षटकांत ६८ धावांत ७, सिद्धेश नेरळ ३७ धावांत दोन
आणि उमेश यादव ६५ धावांत
एक बळी.)