Join us  

विजयामुळे बदलले ‘ड्रेसिंग रूम’चे समीकरण, ‘फॅब फोर’चे महत्त्व वाढले; कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून देणाऱ्या अजिंक्य रहाणेला कर्णधारपदी नेमण्याची मागणी होत असली तरी वास्तव वेगळे आहे. निकट भविष्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाला धक्का लागण्याची शक्यता नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 4:22 AM

Open in App

नवी दिल्ली : ॲडिलेड ते ब्रिस्बेन या चार कसोटी सामन्यांच्या प्रवासात सारे काही बदलले. ३६ धावांवर गडगडण्याची नामुष्की झेलणे ते ‘गाबाचा गड सर करणे’ या वाटचालीत युवा खेळाडूंनी जे धैर्य, झुंजारवृत्ती आणि संयम दाखविला, त्याला क्रिकेट विश्वाने सॅल्यूट केला. या विजयामुळे ड्रेसिंग रूममधील समीकरण काही प्रमाणात बदलले आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून देणाऱ्या अजिंक्य रहाणेला कर्णधारपदी नेमण्याची मागणी होत असली तरी वास्तव वेगळे आहे. निकट भविष्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाला धक्का लागण्याची शक्यता नाही. एक मात्र खरे की मेलबोर्न, सिडनी आणि ब्रिस्बेन या तिन्ही कसोटी सामन्यात जी रणनीती आखण्यात आली, खेळाडूंनी जी सांघिकवृत्ती दाखवली त्यामुळे  रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा आणि रहाणे यांचे ड्रेसिंग रूममधील महत्त्व वाढले. आधीच्या तुलनेत या चार खेळाडूंच्या मतांना अधिक महत्त्व दिले जाईल. कोहली कर्णधार या नात्याने सर्वांत पुढे असेल मात्र सामूहिक चर्चेत या चारही खेळाडूंचे मत बरोबरीचे राहणार आहे. चौघांचे मत गंभीरपणे विचारात घेतले जाईल शिवाय संघाच्या बैठकीत कर्णधार या चारही खेळाडूंच्या मतांना बरोबरीचे स्थान देईल.अजिंक्य रहाणे -ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या पाठोपाठ सर्वाधिक धावा काढून भारतीय क्रिकेट विश्वात सर्वांत यशस्वी होण्याचा मान या खेळाडूने मिळविला. कोहलीच्या आगमनानंतर उपकर्णधारपद सांभाळल्यास कसे वाटेल, असा सवाल ब्रिस्बेनमध्ये विचारण्यात आला तेव्हा रहाणे म्हणाला, ‘मी या गोष्टींचा विचार करणार नाही. भारतात परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेचा विचार करू.’ मुंबईच्या या फलंदाजाला २०१८ च्या द. आफ्रिका दौऱ्यात अंतिम एकादशमध्ये स्थान मिळाले नव्हते.

रविचंद्रन अश्विन -अश्विनने तीन सामन्यात १२ गडी बाद केले. लवकरच तो ४०० बळींचा टप्पा गाठणार आहे. मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका होताच अश्विनने सिनियर्स म्हणून भूमिका बजावली. त्या घटनेनंतर अश्विन म्हणाला, ‘सिराजने आम्हाला घटनेची माहिती देताच मी, रोहित आणि अजिंक्य आम्ही तिघांनी सामनाधिकाऱ्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.’

रोहित शर्मा -रोहित चारपैकी तीन डावांमध्ये सहजपणे खेळला. सलामीवीर शुभमन गिल याला त्याच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. रोहित मर्यादित सामन्यांचा बादशाह आहे. कसोटी क्रिकेटमध्येही त्याची उपयुक्तता सिद्ध झाली. दोन कसोटी सामने खेळण्याआधी तो विलगीकरणात राहिला. अनेक निर्णय घेताना त्याची भूमिका मोलाची ठरली होती.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीअजिंक्य रहाणेआर अश्विनरोहित शर्मा