Join us  

लाळ व घामाची जागा व्हॅसलिन घेऊ शकत नाही, नेहरा व हरभजन यांचे मत

भारत काही क्रिकेटपटूंच्या मते, लाळ व घामाचा वापर यासारखे काही प्रकार पूर्णपणे संपविणे शक्य नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 2:13 AM

Open in App

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) कोविड-१९ महामारीनंतर व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चेंडूवर लकाकी आणण्यासाठी कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यास मान्यता देण्याचा विचार करीत आहे तर भारत काही क्रिकेटपटूंच्या मते, लाळ व घामाचा वापर यासारखे काही प्रकार पूर्णपणे संपविणे शक्य नाही.माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशीष नेहरा व फिरकीपटू हरभजन सिंग यांना वाटते की, चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर आवश्यक आहे. माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोपडा मात्र या विचारासोबत सहमत नाही, पण मर्यादा कुठपर्यंत असावी, हे जाणून घेण्यास इच्छुक आहे.चर्चा सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण प्रश्न उपस्थित होत आहेत की जर चेंडू छेडछाड वैध ठरणार असेल तर कुठल्या कृत्रिम पदार्थाचा वापर केल्या जाऊ शकतो. मग ते खिशात असलेले बॉटलचे बुच असेल त्यामुळे चेंडूला एका बाजूने खरबडीत करता येईल किंवा चेंडू चमकविण्यासाठी व्हॅसलिन (जॉन लिव्हरने प्रसिद्ध केलेले) की चेन झिपर?नेहराने कृत्रिम पदार्थाचा वापर करण्याचा विचार फेटाळून लावताना सांगितले की, ‘जर तुम्ही चेंडूला लाळ किंवा घाम लावणार नाही तर चेंडू स्विंग होणार नाही. स्विंग गोलंदाजीमध्ये ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे.>व्हॅसलिनमुळे वेगवान गोलंदाजीला मदत होऊ शकत नाही, असे सांगताना नेहरा म्हणाला, ‘लाळेची गरज का भासते? घाम लाळेपेक्षा अधिक वजनी असतो, पण दोन्ही मिळून एवढे वजनी होतात की चेंडू रिव्हर्स स्विंगसाठी एका बाजूने वजनदार होतो. व्हॅसलिनचा त्यानंतर वापर केला जाऊ शकतो, त्यापूर्वी नाही. कारण व्हॅसलिन हलके असते. त्यामुळे चेंडूला लकाकी येऊ शकते, पण चेंडूमध्ये जडपणा येत नाही.’