बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी होणं ही काही साधी गोष्ट नाही. पण सध्या या शोमध्ये सहभागी झालेला एक स्पर्धक चांगल्या कारणासाठी नव्हे, तर नकारात्मक वर्तनामुळे चर्चेत आला आहे. हा चेहरा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून, केबीसी १७ मधील ज्युनिअर स्पर्धक इशित भट आहे.
क्रिकेटर फक्त मुलाच्या बचावासाठी आला नाही तर...
अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसल्यावर कौतुक होण्याऐवजी फक्त १० वर्षांच्या या मुलावर ट्रोल होण्याची वेळ आली. सोशल मीडियावर त्याच्यावर “बिग बींसमोर उद्धट वागला” असा आरोप करण्यात आला. पण आता या ट्रोल्सना सडेतोड उत्तर देत, भारताचा स्टार क्रिकेटपटू वरुण चक्रवर्ती या मुलाच्या बचावासाठी पुढे आला आहे. टीम इंडियाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने इशितच्या संदर्भात शेअर केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ही पोस्ट फक्त एका बालस्पर्धकासाठी भावनिक होऊन लिहिलेली नाही, तर सोशल मीडियाच्या जगात विदारक वास्तवाकडे लक्षवेधणारी आहे.
नेमकं काय म्हणाला वरुण चक्रवर्ती?
वरुण चक्रवर्तीनं अधिकृत एक्स अकाउंटवरुन ट्विट करताना लिहिलंय की, "हे एक अस उदाहरण आहे की, सोशल मीडिया अविचारी लोकांचा अड्डा बनला आहे. अरे, तो मुलगा आहे ना.. परमेश्वराचा विचार करा. त्याला मोठे होऊ द्या. जर तुम्हाला एका लहान मुलाचं वागणं सहन होत नसेल, तर कल्पना करा या मुलासह आणि इतरांवर विनाकारण व्यक्त होणाऱ्यांना समाज कसा सहन करत आहे”
...म्हणून क्रिकेटरची पोस्ट विचार करायला भाग पाडते
वरुण चक्रवर्तीच्या पोस्टनंतर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर बेभानपणे काहीही बोलणाऱ्या लोकांवर लगाम लावायचा असेल, तर वरुण चक्रवर्तीसारख्या संवेदनशील आणि समतोल प्रतिक्रियांचीच गरज आहे, असा सूर आता उमटताना दिसतोय. आजकाल एखादा ट्रेंड आला की, विचार न करता तो फॉलो करण्याची सवय झाली आहे. ट्रोलिंगच्या बाबतीतही हेच चित्र दिसतं. ना मुद्दा समजून घ्यायचा, ना परिस्थितीचा विचार करायचा. १० वर्षांच्या मुलाबाबतही तेच घडलं, आणि यामुळेच वरुणची पोस्ट विचार करायला भाग पाडते.