Join us  

Unmukt Chand : भारताचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदनं इतिहास रचला; BBLमध्ये पहिला भारतीय खेळला, पण...

Unmukt Chand makes his BBL debut : भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंद यानं मंगळवारी इतिहास घडवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 5:55 PM

Open in App

Unmukt Chand makes his BBL debut : भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंद यानं मंगळवारी इतिहास घडवला. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये ( BBL) त्यानं मेलबर्न रेनेगॅड्स संघाकडून ( MELBOURNE RENEGADES) संघाकडून पदार्पण केले. BBLमध्ये खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. उन्मुक्तनं मागील वर्षी भारतातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेताना अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यानं अमेरिकेतील क्रिकेट स्पर्धा गाजवली अन् त्याला BBLचे तिकीट मिळालं. आज त्यानं पदार्पण केलं, पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. विशेष म्हणजे संघाला खरी गरज असताना तो बाद झाला अन् हॉबर्ट हरिकेन्स ( HOBART HURRICANES) संघानं ६ धावांनी सामना जिंकला. उन्मुक्त चंद ( Unmukt Chand) याच्या नेतृत्वाखाली भारतानं २०१२चा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप  जिंकला होता. त्यानं अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १११ धावांची खेळी केली होती.  उन्मुक्तनं ६७ प्रथम श्रेणी सामन्यात ८ शतकं व १६ अर्धशतकांसह ३३७९ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १२० सामन्यांत ७ शतकं व ३२ अर्धशतकांसह ४५०५ धावा आहेत, तर ट्वेंटी-२०त त्यानं ७७ सामन्यांत १५६५ धावा केल्या असून त्यात ३ शतकं व ५ अर्धशतकांचा समावेश आहे. भारताचा हा माजी कर्णधार सध्या अमेरिकेच्या ट्वेंटी-२० लीगमध्ये धुमाकूळ घालत आहे. अमेरिकेत उन्मुक्तनं १४ ट्वेंटी-२०त १ शतकासह ५३४ धावा केल्या. त्यात त्यानं १८ षटकार व ५२ चौकार खेचले आहेत.  

आजच्या सामन्यात काय झालं?प्रथम फलंदाजी करताना हॉबर्ट हरिकेन्स संघानं ५ बाद १८२ धावा केल्या. कर्णधार मॅथ्यू वेडनं ३९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४८ धावा केल्या. कॅलेब जेवेल व डीआर्सी शॉर्ट यांनी अनुक्रमे ३५ व ३७ धावांचे योगदान दिले. पण, टीम डेव्हिडनं २० चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ४६ धावा करताना संघाला मोठा पल्ला उभारून दिला.

प्रत्युत्तरात मेलबर्न रेनेगॅड्सच्या पहिल्या तीन फलंदाजांनी दमदार फटकेबाजी केली. जेम्स सेयमोर १३ चेंडूंत २४ धावा करून माघारी परतला. कर्णधार आरोन फिंच व शॉन मार्श यांनी वैयक्तित अर्धशतक झळकावून संघाला विजयाच्या समीप आणले. मार्श ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५१ धावांवर माघारी परतला. तेव्हा उन्मुक्त चंद फलंदाजीला आला आणि संघाला विजयासाठी पाच षटकांत ४२ धावा करायच्या होत्या. चंद ८  चेंडूंत ६ धावांवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. फिंचही ५२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारासह ७५ धावांवर बाद झाला. मेलबर्नला ६ बाद १७६ धावाच करता आल्या. 

टॅग्स :उन्मुक्त चंदबिग बॅश लीगअ‍ॅरॉन फिंच
Open in App