दुबई : न्यूझीलंडमध्ये आगामी ३ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या अंडर १९ क्रिकेट विश्वचषकात सहभागी होत असलेल्या भारतीय संघाचा उत्साह वाढविताना सलामीवीर खेळाडूंनी भारताच्या युवा खेळाडूंना स्वत:मधील उणिवा शोधून दूर करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ असल्याचे म्हटले आहे.
भारताने पाचवेळा अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले असून, तीनदा स्पर्धा जिंकली आहे. २००४ मध्ये १९ वर्षे विश्वचषकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला सलामीवीर शिखर धवन म्हणाला, ‘या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाचा अनुभव मिळतो. स्वत:मधील उणिवा शोधून त्या दूर करणे शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरील चुरस जाणून घेण्याची ही संधी आहे. अंडर-१९ विश्वचषकात खेळणारे अनेक खेळाडू पुढे देशाच्या सिनियर राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करतात.’
शिखर पुढे म्हणाला,‘या स्पर्धेचे महत्त्व वाढले आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाºया खेळाडूंना देशाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळते, हे गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवरून निष्पन्न झाले आहे. या स्पर्धेबाबत माझ्या काही चांगल्या स्मृती आहेत. विश्वचषकात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाल्यानंतर मी आत्मविश्वासाच्या बळावर सिनियर संघात स्थान मिळविले.’
अष्टपैलू रवींद्र जडेजाने दोनदा अंडर-१९ विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व केले. तो म्हणाला,‘ याच स्पर्धेच्या बळावर मी सिनियर संघात स्थान पटकवू शकलो. २००८ मध्ये भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वात विजेतेपद पटकविले त्या संघात जडेजाचा समावेश होता. तो पुढे म्हणाला,‘नवे काही शिकण्याचे हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे.’ (वृत्तसंस्था)
>दोन हॅट्ट्रिकचा मानकरी...
चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने २०१४ च्या विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदविली होती. तो म्हणाला,‘पाकविरुद्ध पहिल्या सामन्यात मला बळी घेता आला नव्हता. स्कॉटलंडविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदविताच संघाला लाभ झाला, नंतर आॅस्ट्रेलिया विरुद्धदेखील मी हॅट्ट्रिकची नोंद केली. अंडर-१९ विश्वचषकात एक तसेच वन डे सामन्यात एक अशी दोन हॅट्ट्रिकची नोंद माझ्या नावावर आहे.’