माऊंट माऊंगानुई (न्यूझीलंड) : भारतीय संघ आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत मंगळवारी कमकुवत पापुआ न्यू गिनिया संघाविरुद्ध बाद फेरीत स्थान मिळविण्याच्या निर्धाराने खेळणार आहे.
तीनवेळा जेतेपदाचा मान मिळविणाºया भारतीय संघाने या स्पर्धेत पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा १०० धावांनी पराभव करीत शानदार सुरुवात केली. गटातील चौथा संघ झिम्बाब्वे असून सध्याचा फॉर्म बघता भारतीय संघ बाद फेरीत सहज प्रवेश करेल, असे मानल्या जात आहे.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानतंर सर्वकाही रणनीतीप्रमाणे घडले. मंगळवारी दुसºया लढतीतही याचीच पुनरावृत्ती होण्याची आशा आहे.
शॉ, मनज्योत कालरा आणि शुभमान गिल यांनी फलंदाजीमध्ये छाप सोडली तर शिवम मावी व कमलेश नारकोटी यांनी वेगवान मारा करीत वर्चस्व गाजवले. आशिया कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय संघाने सलामी लढतीत आपला निर्धार जाहीर केला. भारताला आता पूर्व आशिया प्रशांत क्लालिफायरमध्ये अपराजित राहात आठव्यांदा विश्वकपसाठी पात्रता मिळवणाºया संघाविरुद्ध खेळायचे आहे. खेळाच्या सर्वच विभागात पारडे जड असले तरी भारतीय संघ प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखण्याची चूक करणारा नाही. राहुल द्रविडसारख्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ आत्मसंतुष्ट राहणार नाही, अशी आशा आहे. भारत अंडर-१९ विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वांत यशस्वी संघ ठरला आहे. भारताने तीनदा जेतेपद पटकावले आहे तर दोनदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. २०१६ मध्ये भारताला अंतिम फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी मात्र भारतीय संघाचा जेतेपदाला गवसणी घालण्याचा निर्धार असेल. वांगरेईमध्ये अन्य लढतीत पाकिस्तानची गाठ आयर्लंडसोबत पडणार आहे.
भारत :- पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभमान गिली, आर्यन जुयाल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, हार्विक देसाई, मनज्योत कालरा, कमलेश नागरकोटी, पंकज यादव, रियान पराग, ईशान पोरेल, हिमांशू राणा, अनुकूल राय, शिवम मावी, शिवा सिंग.
पापुआ न्यू गिनिया :- सेमी कामिया (कर्णधार), एसा इका, जेम्स ताऊ, ताऊन तोआ नोऊ, नोऊ रोरूआ, इगो माहुरू, सिमान अताई, लेके मोरिया, वागी काराहो, केवाऊ ताऊ, हिगी तोऊआ, दोऊरे एगा, ओविया सॅम, सिनाका अरुआ, बोगे अरुआ.