माऊंट माऊंगानुई : तीनदा जेतेपदाचा मान मिळविणा-या भारतीय संघाने पापुआ न्यू गिनिया संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवीत
आयसीसी अंडर-१९ विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. कर्णधार पृथ्वी शॉ याने आक्रमक अर्धशतकी खेळी केली, तर फिरकीपटू अनुकूल रायने प्रथमच ५ बळी घेतले. हे दोन्ही खेळाडू भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. रायने ६.५ षटकांत १४ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले.
त्याआधी, कर्णधार शॉने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ओविया सॅम (१५) व सिमोन अताई (१३) यांचा अपवाद वगळता पापुआ न्यू गिनिया संघाच्या अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. त्यांचा डाव २१.५ षटकांत ६४ धावांत संपुष्टात आला. हा स्पर्धेत धावसंख्येचा नीचांक आहे. पापुआ न्यू गिनिया संघ २०१४ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये अखेरचा विश्वकप खेळला होता. त्यापूर्वी आशिया प्रशांत क्वालिफायरमध्ये अपराजित राहून आठव्यांदा विश्वकपमध्ये स्थान मिळविले.
भारताचा वेगवान गोलंदाज शिवम मावी याने २ विकेट घेतल्या,
तर कमलेश नागरकोटी व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. भारताची यानंतरची लढत १९ जानेवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध होईल.
शॉचे अर्धशतक; रॉयची भेदक गोलंदाजी
पहिल्या लढतीत आॅस्ट्रेलियाचा १०० धावांनी पराभव करणाºया भारताने
८ षटकांत गडी न गमावता विजयी लक्ष्य गाठले. शॉने ३९ चेंडूंमध्ये १२ चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. त्याचे हे स्पर्धेतील दुसरे अर्धशतक आहे. रायने ज्युनिअर वन-डे क्रिकेटमध्ये प्रथमच ५ बळी घेतले.
धावफलक
पापुआ न्यू गिनिया : सिमोन अताई धावबाद १३, इगो माहुरू पायचित गो. मावी ४, हिगी तोउआ त्रि. गो. मावी ०, ओविया सॅम झे. मावी गो. राय १५, वागी काराहो झे. जुयाला गो. अर्शदीप ६, सिनाका अरुआ त्रि. गो. राय १२, केवाऊ झे. गिल गो. राय २, लेके मोरिया त्रि. गो. नागरकोटी ०, जेम्स ताऊ त्रि. गो. राय ०, बोगे अरुआ नाबाद ०, सेमो कामिया त्रि. गो. राय ०. अवांतर : १२. एकूण : २१.५ षटकांत सर्व बाद ६४. गोलंदाजी : मावी ५-०-१६-२, नागरकोटी ६-३-१७-१, राय ६.५-२-१४-५, अर्शदीप ३-०-१०-१, सिंग १-०-१-०.
भारत : पृथ्वी शॉ नाबाद ५७, मनज्योत कालरा नाबाद ९. अवांतर : १. एकूण : ८ षटकांत बिनबाद ६७. गोलंदाजी : कामिया ३-०-२७-०, ताऊ ४-०-२८-०, मोरिया १-०-११-०.