Join us  

ICC U-19 World Cup: झिम्बाब्वेविरुद्ध द्रविडच्या शिष्यांना विजयाच्या हॅटट्रिकची संधी

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवातीच्या दोनही सामन्यात दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 10:10 AM

Open in App
ठळक मुद्देआयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. दुसऱ्या सामन्यात त्यांना पपुआ न्यू गिनी या तुलनेनं दुबळ्या प्रतिस्पर्ध्यांचा खेळ खल्लास करून टाकला.

माउंट माँगानुई: 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवातीच्या दोनही सामन्यात दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेनं यंग टीम इंडियापुढे 155 धावांचं लक्ष्य ठेवलंय. 'द वॉल' राहुल द्रविडच्या शिष्यांचा फॉर्म पाहता, हे आव्हान पार करणं त्यांच्यासाठी फारसं कठीण नसल्याचंच दिसतंय.

आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. सलामीच्या सामन्यात तगड्या ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी धुव्वा उडवून पृथ्वी शॉच्या शिलेदारांनी आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात त्यांनी पपुआ न्यू गिनी या तुलनेनं दुबळ्या प्रतिस्पर्ध्यांचा 'खेळ खल्लास' करून टाकला. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडियानं आधीच उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. 

स्वाभाविकच, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जातंय. याआधी भारत आणि झिम्बाब्वेच्या 19 वर्षांखालील संघांमध्ये चार सामने झाले होते आणि टीम इंडियानं विजयाचा चौकार लगावला होता. या लौकिकाला साजेशी कामगिरी करतच, प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेला भारतीय गोलंदाजांनी 154 धावांवर रोखलंय. 

झिम्बाब्वेच्या डावाची सुरुवात अगदीच वाईट झाल्यानंतर, कर्णधार लियाम रोचे, मिल्टन शुम्बा आणि आणि वेस्ले मादेवेरे यांनी त्यांचा डाव सावरला. पण, अनुकूल रॉयनं 20 धावांत चार विकेट घेऊन झिम्बाब्वेची मधली फळी मोडली, तर अर्शदीप सिंग आणि अभिषेक शर्मानं प्रत्येकी दोन विकेट घेऊन त्याला उत्तम साथ दिली. त्यामुळे भारतीय फलंदाजांचं काम तुलनेनं सोपं झालं आहे. अर्थात, क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. पण, आत्ता तरी भारतालाच विजयाची अधिक संधी दिसतेय. 

टॅग्स :19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाक्रिकेट