चेस्टरफिल्ड : मनजोत कालराचे शतक आणि कमलेश नागरकोटीच्या एकूण १० बळींच्या जोरावर भारताने पहिल्या चार दिवसीय कसोटी क्रिकेट सामन्यात १९ वर्षांखालील संघास ३३४ धावांनी पराभूत केले.
प्रथम फलंदाजी करताना भारताच्या हार्विक देसाई (८९) आणि मनजोत (१२२) यांनी दमदार खेळी केली. भारतीय संघाने पहिल्या डावात ५१९ धावा केल्या. पृथ्वी शाहने ८६ आणि रियान पराग दासने ६८ धावा केल्या. इंग्लंडकडून जोश टंग, हेन्री ब्रुक्स आणि अमार विर्दी यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव ५४.२ षटकांत १९५ धावांवर संपुष्टात आला. नागरकोटीने पाच आणि शिवम मावीने चार बळी मिळविले. विल जॅकने सर्वाधिक ४६ धावा केल्या. कर्णधार मॅक्स होल्डनने ३२ तर रियान पटेलने ३८ धावा केल्या. भारताने दुसरा डाव १७३ धावांवर घोषित केला. इंग्लंडचा संघ १६३ धावांवर बाद झाला.