Join us  

CSK च्या मराठमोळ्या शिलेदाराने मोडला ७८ वर्षांपूर्वीचा विक्रम; मुंबईच्या मैदानावर घडला पराक्रम

Mumbai vs Baroda, 2nd Quarter Final: मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:47 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. मुंबई आणि बडोदा यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात तुषार देशपांडेच्या शतकी खेळीने रंगत आणली. रणजी ट्रॉफी २०२३-२४ च्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तनुष कोटियन (१२०*) आणि तुषार देशपांडे (१२३) यांनी मुंबई क्रिकेट संघाच्या दुसऱ्या डावात शानदार शतके झळकावली. मुंबईकडून १०व्या आणि ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शिलेदारांनी ऐतिहासिक कामगिरी केली.

आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच डावात शतके झळकावणारी १० आणि ११व्या क्रमांकाची ही दुसरी जोडी बनली आहे. याआधी चंदू सरवटे आणि शुटे बॅनर्जी या जोडीने १० आणि ११ क्रमांकावर फलंदाजी करताना शतके झळकावली होती. या जोडीने १९४६ मध्ये शतके झळकावली आणि १०व्या बळीसाठी २४९ धावांची भागीदारी केली. मराठमोळा तुषार देशपांडे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा भाग आहे. 

मुंबईच्या शिलेदारांनी रचला इतिहास

मंगळवारी कोटियन आणि देशपांडे यांनी १०व्या बळीसाठी २०० हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शेवटच्या बळीसाठी २०० हून अधिक धावांची भागीदारी होण्याची ही तिसरी वेळ आहे. मुंबईने दुसऱ्या डावात ३३७ धावांवर ९ बळी गमावले. यानंतर कोटियन आणि देशपांडे यांनी अविश्वसनीय कामगिरी करत शतके झळकावली. शेवटचा बळी म्हणून १२३ धावा करून देशपांडे बाद झाला. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि ८ षटकार मारले. कोटियनने १२९ चेंडूत १२० धावा करून तो नाबाद राहिला. या जोडीने २३२ धावांची भागीदारी केली.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाने मजबूत आघाडी घेतली. बडोदाच्या संघासमोर विशाल लक्ष्य उभारण्यात मुंबईच्या संघाला यश आले. पण, कर्णधार अजिंक्य रहाणेचा खराब फॉर्म कायम आहे. रहाणेने दोन्ही डावांत अनुक्रमे ३ आणि ० अशा धावा केल्या. त्याला दोन्हीही वेळा भार्गव भट्टने बाहेरचा रस्ता दाखवला. 

मुंबईने दिले तगडे लक्ष्यमुंबईने दुसऱ्या डावात ५६९ धावा केल्या आणि त्यांची एकूण आघाडी ६०५ धावांची झाली. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू असताना बडोद्याला विजयासाठी ६०६ धावांची गरज आहे. लक्षणीय बाब म्हणजे सामना अनिर्णित राहिला तर मुंबईचा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.

टॅग्स :अजिंक्य रहाणेरणजी करंडकमुंबई