Join us  

विश्वचषकाआधीची तिरंगी मालिका खूप महत्त्वाची, सांगतेय भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना

गेल्याचवर्षी स्मृतीला क्रिकेटविश्वात केलेल्या दमदार कामगिरीमुळे ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 5:39 PM

Open in App

मुंबई : टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी २० दिवस आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये राहणार असून या दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या बलाढ्य संघांचा समावेश असलेल्या  तिरंगी स्पर्धेत खेळू. त्यामुळे ही स्पर्धा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून याद्वारेच संघ कितपत तयार आहे हे कळेल,’ असे भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

डिसेंबरमध्ये जागतिक एकदिवसीय आणि टी२० महिला संघात निवड करुन आयसीसीने स्मृतीचा सन्मान केला होता. तसेच गेल्याचवर्षी स्मृतीला क्रिकेटविश्वात केलेल्या दमदार कामगिरीमुळे ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. २१ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात रंगणाºया टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ गुरुवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.स्मृती म्हणाली की, ‘विश्वचषक स्पर्धेचा माझ्यावर कोणताही दबाव नाही. मुख्य स्पर्धेआधी आम्ही तिथे तिरंगी मालिका खेळू. त्यामुळे ही मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची असून इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार असल्याने तगड्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळण्याचा सराव होईल. या मालिकेमुळे येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यास खूप मदत होईल. विश्वचषकाआधी २० दिवस आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये राहणार असल्याचा फायदाच होईल.’

स्वत:वर कोणत्याही प्रकारचे दडपण ओढावून घेणार नसल्याचे सांगताना स्मृती म्हणाली की, ‘मी माझ्या कामगिरीचा फार विचार करत नाहीए. यामुळे कदाचित माझ्यावर दडपण येईल. त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टींवर मी लक्ष देत नाही. इंग्लंडमध्ये २०१७ साली झालेल्या विश्वचषकातून मी माझ्या चुकांतून शिकले. कारण जेव्हापण मी चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवते, तेव्हा मी दबावात येते. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये केवळ एक स्पर्धा खेळण्यासाठी जात असल्याचा विचार करुन खेळण्याचा प्रयत्न आहे.’

------------------------आॅस्टेÑलियातील महिला बिग बॅश लीगचा अनुभव स्मृतीसह भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याकडेही आहे. याविषयी स्मृती म्हणाली, ‘बिग बॅश लीगदरम्यान जवळपास सर्वच मैदानावर खेळल्याने तो अनुभव निर्णायक ठरेल. विशचषक साखळी सामने बी ग्रेडच्या मैदानावर होतील आणि बिग बॅशदरम्यान या मैदानावर खेळल्याचा फायदाच होईल. मला आणि हरमनप्रीतला या गोष्टींची माहिती असून नुकताच भारत अ संघानेही ऑस्ट्रेलिया दौरा केलेला असल्याने संघातील बहुतेक खेळाडूंना येथील परिस्थितीचा अनुभव आहे.’

शेफालीच्या फटक्यांची भितीयुवा सलामीवीर शेफाली वर्माचे कौतुक करताना स्मृती म्हणाली, ‘शेफालीसोबतचा अनुभव खूप चांगला आहे. ती संघात नवखी असल्याचे अजिबात वाटत नाही. आमची विचारसरणीही एकसारखीच असून आम्ही दोघीही फार विचार न करता फलंदाजीला जातो  .  तिच्यासमोर खेळताना एकच भिती असते तिच्या फटक्यांची. कारण ती समोरच्या बाजूने मोठ्या ताकदीने फटके मारते.’  

म्हणून मी नशीबवान!‘मला दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीसोबत खेळण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. ती जबरदस्त गोलंदाज असून माझे सुदैव आहे की आम्ही एकाच संघातून खेळतो. त्यामुळेच कधीही तिच्या गोलंदाजीविरुद्ध खेळण्याची वेळ माझ्यावर  आली नाही आणि यासाठी मी स्वत:ला नशीबवान मानते,’ असेही स्मृतीने म्हटले.‘आज सातत्यपूर्ण कामगिरीसाठी तंदुरुस्ती राखणे खूप महत्त्वाचे आहे. मी यासाठी विराट कोहलीला आदर्श मानते. त्याच्या तंदुरुस्तीचा स्तर शानदार आहे. त्याच्यासह संपूर्ण भारतीय पुरुष संघाची तंदुरुस्ती उच्च दर्जाची असून त्याजोरावरच ते सातत्याने यश मिळवत आहेत,’ असे स्मृती मानधनाने सांगितले.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघ