भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर ट्रॅव्हिस हेड याने भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी एकदिवसीय मालिका खूप महत्त्वाची आहे, कारण या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही दीर्घकाळानंतर एकत्र खेळताना दिसणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाने कोणताही एकदिवसीय सामना खेळला नाहीत.
सध्या हे दोन्ही खेळाडू फक्त एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. त्यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. दरम्यान, रोहित शर्माकडून एकदिवसीय कर्णधारपदही काढून घेण्यात आले असून, त्याच्या जागी शुभमन गिल संघाचे नेतृत्व करणार आहे.
ट्रेव्हिस हेड काय म्हणाला?
भारतीय क्रिकेटमधील या दोन महान खेळाडूंच्या भविष्याबद्दल ट्रॅव्हिस हेडला विचारले असता, त्याने त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. ट्रेव्हिस हेड म्हणाला की, त्याने विराट कोहलीला सर्वकालीन महान व्हाईट बॉल क्रिकेटपटू मानतो. त्याचबरोबर, त्याने रोहित शर्माला कोहलीपेक्षा कमी न लेखता, दोघांनीही येत्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली. ट्रॅव्हिस हेडच्या या वक्तव्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर दबाव वाढला आहे. आगामी एकदिवसीय मालिकेत त्यांच्या कामगिरीवरच त्यांचे २०२७ च्या विश्वचषकातील स्थान निश्चित होणार आहे.
रोहित- विराटसमोर मोठं आव्हान
विश्वचषकाला अजून वेळ असला तरी, या काळात रोहित आणि विराटला त्यांची तंदुरुस्ती आणि फॉर्म टिकवून ठेवणे आवश्यक आहे. या मालिकेदरम्यान कोहली आणि रोहित यांच्यावर मोठ्या धावा करण्याचा दबाव असेल. या मालिकेद्वारे ते भरपूर धावा करून त्यांच्या टीकाकारांना योग्य उत्तर देण्याची संधी देखील साधू शकतात.