Join us  

लंकेविरुद्ध तुफानी रो‘हिट’ शो...भारताची २-० अशी विजयी आघाडी

‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने झळकालेल्या झंझावाती शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने दुस-या टी२० सामन्यात श्रीलंकेचा ८८ धावांनी पराभव केला. यासह तीन सामन्यांची मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली. रोहित - राहुल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २० षटकात ५ बाद २६० धावांचा एव्हरेस्ट उभारला. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १७.२ षटकात १७२ धावांत संपुष्टात आणला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 1:57 AM

Open in App

इंदूर : ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने झळकालेल्या झंझावाती शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने दुस-या टी२० सामन्यात श्रीलंकेचा ८८ धावांनी पराभव केला. यासह तीन सामन्यांची मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली. रोहित - राहुल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २० षटकात ५ बाद २६० धावांचा एव्हरेस्ट उभारला. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १७.२ षटकात १७२ धावांत संपुष्टात आणला.होळकर स्टेडियमवर रोहित - राहुल यांच्या झंझावातानंतर कुशल परेरा - उपुल थरंगा यांनी धुवाधार फटकेबाजी करत श्रीलंकेच्या आशा कायम ठेवल्या. पण पाठोपाठच्या षटकात दोघेही परतल्याने लंकेच्या फलंदाजीला गळती लागली आणि त्यांचा डाव १७२ धावांत संपुष्टात आला. परेराने ३७ चेंडूत ४ चौकार व ७ षटकार ठोकताना ७७ धावांची शानदार खेळी केली. थरंगाने २९ चेंडूत ३ चौकार २ षटकारांसह ४७ धावा फटकावल्या. १५व्या षटकात चायनामन कुलदीप यादवने निर्णायक कामगिरी करताना कुशलसह कर्णधार थिसारा परेरा आणि असेला गुणरत्ने यांना बाद करुन लंकेची मधली फळी कापली. इथेच लंकेचा पराभव स्पष्ट झाला. युझवेंद्र चहल (४/५२) आणि कुलदीप (३/५२) यांनी पुन्हा एकदा लंकेला आपल्या जाळ्यात अडकवले.तत्पूर्वी, रोहितने पुन्हा एकदा श्रीलंकेच्या गोलंदाजांना बदडताना तुफानी शतक झळकावले. याआधी तिसरे वैयक्तिक एकदिवसीय द्विशतक झळकावलेल्या रोहितने यावेळी दुसरे वैयक्तिक टी२० शतक केवळ ३५ चेंडूत झळकावले. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हीड मिल्लरच्या जलद टी२० आंतरराष्ट्रीय शतकाची बरोबरीही केली. नाणेफेक जिंकून श्रीलंका कर्णधार परेराने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतु, लंकेने आपल्याच पायावर धोंडा मारुन घेत रोहित - लोकेश राहुल यांना मनसोक्त फटकेबाजीची संधी दिली. राहुलच्या तुलनेत रोहितने तुफानी हल्ला करताना लंकेच्या गोलंदाजांना रडकुंडीला आणले. रोहितचा धडाका पाहून त्याला चेंडू कुठे आणि कसा टाकावा हाच प्रश्न लंकेच्या गोलंदाजांपुढे पडला होता. रोहित - राहुल यांनी केवळ ७६ चेंडूत १६५ धावांची वादळी सलामी देत लंकेच्या गोलंदाजीची पिसे काढली.दानुष्का चमीराच्या गोलंदाजीवर रोहित बाद झाला आणि लंकेने सुटकेचा नि:श्वास टाकला. रोहितने ४३ चेंडूत १२ चौकार व १० षटकरांसह ११८ धावांचा तडाखा दिला. मात्र, यानंतर लंकेची अवस्था आगीतून फुफाट्यात आल्यासारखी झाली. महेंद्रसिंग धोनीला तिसºया क्रमांकावर बढती मिळाली. त्याने आल्याआल्याच दोन खणखणीत चौकार मारुन आपला इरादा स्पष्ट केला.राहुल - धोनी यांनी लंकेला अक्षरश: फोडले. दोघांनी दुसºया विकेटसाठी ३५ चेंडूत ७८ धावांची भागीदारी करुन लंकेचे मानसिक खच्चीकरण केले. शतकापासून ११ धावांनी दूर असताना राहुल झेलबाद झाला. त्याने ४९ चेंडूत ५ चौकार व ८ षटकारांसह ८९ धावांची झंझावाती खेळी केली. यानंतर धोनी (२८), हार्दिक पांड्या (३ चेंडूत १०) यांनी भारताला अडीचशेचा पल्ला पार करुन दिला. यानंतर झटपट बळी गेल्याने भारताला आॅस्टेÑलियाचा सर्वाधिक २६३ धावांचा विक्रम मोडण्यात थोडक्यात अपयश आले. दुखापतग्रस्त अँजेलो मॅथ्यूजचा अपवाद वगळता प्रत्येक गोलंदाजाची ११ हून अधिक धावगतीने धुलाई झाली. (वृत्तसंस्था)

  • रोहित शर्माने आपले दुसरे वैयक्तिक टी२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.
  • टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. याआधी गेल्यावर्षी भारताने विंडीजविरुद्ध २४४ धावा केल्या होत्या.
  • रोहित शर्माने सर्वात जलद टी२० आंंतरराष्ट्रीय शतकाची बरोबरी केली. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हीड मिल्लरनेही ३५ चेंडूत शतक झळकावले होते.
  • रोहित शर्मा टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद शतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला.
  • टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आॅस्टेÑलियाने सर्वाधिक २६३ धावा उभारल्या आहेत. विशेष म्हणजे आॅसीने ही कामगिरी श्रीलंकेविरुद्धच
  • केली होती.
  • रोहित - राहुल यांनी भारताकडून १६५ धावांची सर्वोत्तम सलामी दिली. याआधी हा विक्रम रोहित - धवन (१५८) यांच्या नावावर होता.
  • याआधी रोहित - शिखर धवन यांनी लंकेविरुद्ध ७५ धावांची सर्वोत्तम सलामी दिली होती. तो विक्रम रोहित - राहुल यांनी या सामन्यात मागे टाकला.
  • भारताने १० षटकात तब्बल ११७ धावा काढल्या. आतापर्यंतची ही भारताची सर्वोत्तम कामगिरी.

धावफलक-भारत : रोहित शर्मा झे. धनंजय गो. चमीरा ११८, लोकेश राहुल झे. डिकवेला गो. प्रदीप ८९, महेंद्रसिंग धोनी त्रि. गो. परेरा २८, हार्दिक पांड्या झे. समरविक्रमा गो. प्रदीप १०, श्रेयस अय्यर पायचीत गो. परेरा ०, मनिष पांडे नाबाद १, दिनेश कार्तिक नाबाद १. अवांतर - ९. एकूण : २० षटकात ६ बाद २६० धावा.गोलंदाजी : अँजेलो मॅथ्यूज २.२-०-१६-०; दुष्मंथा चमीरा ४-०-४५-१; नुवान प्रदीप ४-०-६१-२; अकिला धनंजय ३.४-०-४९-०; थिसारा परेरा ४-०-४९-२; चतुरंगा डिसिल्व्हा १-०-१६-०; असेला गुणरत्ने १-०-२१-०.श्रीलंका : निरोशन डिकवेला झे. हार्दिक गो. उनाडकट २५, उपुल थरंगा झे. व गो. चहल ४७, कुशल परेरा झे. मनिष गो. कुलदीप ७७, थिसारा परेरा झे. हार्दिक गो. कुलदीप ०, असेला गुणरत्ने यष्टीचीत धोनी गो. कुलदीप ०, सदीरा समरविक्रम यष्टीचीत गो. चहल ५, चतुरंगा डिसिल्व्हा त्रि. गो. चहल १, अकिला धनंजय झे. मनिष गो. चहल ५, दुष्मंता चमीरा त्रि. गो. हार्दिक ३, नुवान प्रदीप नाबाद ०. अवांतर - ९. एकूण : १७.२ षटकात सर्वबाद १७२ धावा.गोलंदाजी : जयदेव उनाडकट ३-०-२२-१;जसप्रीत बुमराह ३-०-२१-०; कुलदीप यादव ४-०-५२-३; हार्दिक पांड्या ३.२-०-२३-१;युझवेंद्र चहल ४-०-५२-४.

टॅग्स :रोहित शर्माक्रिकेटभारतीय क्रिकेट संघश्रीलंका