Join us  

आजच्या दिवशीच धोनीने बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिरावला होता

तो दिवस होता 23 मार्च 2016. म्हणजेच बरोबर दोन वर्षांपूर्वी. ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये बंगळुरुला सामना झाला होता. या सामन्यात अखेरच्या षटकातील तीन चेंडू झाले आणि बांगलादेश हा सामना जिंकणार, असे कुणालाही वाटले असते. पण धोनीच्या चातुर्यामुळे हा सामना भारताला जिंकता आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 5:38 PM

Open in App
ठळक मुद्देधोनीच्या या चतुराई आणि चपळतेमुळे भारताने हा सामना जिंकला होता.

नवी दिल्ली : निदाहास ट्रॉफीमध्ये भारताने बांगलादेशला पराभूत करत जेतेपद पटकावले. अखेरच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार लगावल्यामुळे भारताला बांगलादेशला पराभूत करता आले होते. पण अखेरच्या चेंडूवर बांगलादेशला पराभूत करण्याची भारताची ही काही पहिलीच वेळ नाही. भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीनेही अखेरच्या चेंडूवर बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिरावला होता.

तो दिवस होता 23 मार्च 2016. म्हणजेच बरोबर दोन वर्षांपूर्वी. ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये बंगळुरुला सामना झाला होता. या सामन्यात अखेरच्या षटकातील तीन चेंडू झाले आणि बांगलादेश हा सामना जिंकणार, असे कुणालाही वाटले असते. पण धोनीच्या चातुर्यामुळे हा सामना भारताला जिंकता आला.

अखेरच्या षटकात बांगलादेशला 11 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर एक धाव बांगलादेशने घेतली. त्यानंतरच्या दोन चेंडूंवर मुशफिकर रहिमने दोन चौकार वसूल केले. दुसरा चौकार फटकावल्यावर तर रहिमने गोलंदाज हार्दिक पंड्यापुढे येऊन असा काही आनंद साजरा केला होता की, जणू काही ते सामना जिंकले आहेत. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी अखेरच्या तीन चेंडूवर दोन धावा हव्या होत्या. त्यावेळी पंड्याला काय करायचे, हे समजत नव्हते. 

कॅप्टन कूल धोनीने त्यावेळी पंड्याला मार्गदर्शन केले. त्यानंतर चौथ्याच चेंडूवर रहिम बाद झाला. त्यानंतरच्या पाचव्या चेंडूवर महमदुल्लाही बाद झाला आणि आता एका चेंडूवर बांगलादेशला विजयासाठी दोन धावांची गरज होती. हा चेंडू टाकताना नेमके काय होणार हे कुणालाही माहिती नव्हते, पण धोनीला मात्र काय होणार याची कुणकुण लागली होती. त्याने आपल्या एका हातातील ग्लोव्ह्ज काढून ठेवले होता. पंड्याचा तो अखेरचा चेंडू बांगलादेशच्या फलंदाजाला खेळता आला नाही आणि तो चेंडू थेट धोनीच्या हातात येऊन विसावला. धोनी त्यानंतर भन्नाट वेगाने पळत सुटला आणि धोनीने त्या फलंदाजाला धावचीत केले. जर धोनीने धावचीत केले नसते तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता. धोनीच्या या चतुराई आणि चपळतेमुळे भारताने हा सामना जिंकला होता.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनी