नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) सोमवारी येथे विशेष बैठक (एसजीएम) होणार आहे. या वेळी भारतीय संघाचा भविष्य दौरा कार्यक्रम (एफटीपी) आणि आयपीएलमधून बाहेर केलेल्या कोच्ची टस्कर्सला देण्यात येणाºया ८५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईबाबत चर्चा होईल.
त्याचबरोबर राजस्थान क्रिकेट संघटनेवर (आरसीए) लावण्यात आलेली बंदी उठवण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेकडून (नाडा) आपल्या खेळाडूंची चाचणी न होण्याबाबत या बैठकीमध्ये सर्वांचे एकमत होईल, असेही म्हटले जात आहे. दरम्यान, या बैठकीचा मुख्य विषय २०१९ ते २०२१ पर्यंतचा भारतीय संघाचा ‘एफटीपी’ कॅलेंडर असेल. तसेच सीईओ राहुल जौहरी या वेळी सर्व सदस्यांना आॅक्टोबर - नोव्हेंबर आणि फेब्रुवारी - मार्च या दोन काळाची माहिती देतील. कारण या दरम्यान भारत आंतरराष्ट्रीय संघांचे यजमानपद भूषविणार आहे. त्याचप्रमाणे, या वेळी वर्षात खेळविण्यात येणाºया एकूण दिवसांबाबतही चर्चा होणार आहे. हे दिवस कमी करण्याची इच्छा याआधीच कर्णधार कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली आहे.
त्याचवेळी, सदस्यांपैकी एका गटाने वेगळेच मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटल्यानुसार जर आघाडीच्या खेळाडूंनी विश्रांतीची मागणी केल्यास त्यांना जरुर विश्रांती देण्यात येईल, पण किती दिवस खेळ व्हावा हा निर्णय बीसीसीआयकडेच राहिला पाहिजे. याबाबत बीसीसीआयच्या एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, ‘एकीकडे खेळाडू वेतनवाढीची मागणी करतात आणि दुसरीकडे खेळण्याच्या दिवसांमध्ये कमतरता करण्याची इच्छा व्यक्त करतात. हे कसे शक्य आहे? खेळाडूंना कोणीही बंदूकाची भीती दाखवून खेळण्यास सांगत नाही. जेव्हा पण तुम्हाला विश्रांतीची गरज असेल, तुम्ही ती घेऊ शकता.’ (वृत्तसंस्था)