Join us  

भारत विरुद्धच्या पराभवाच्या टोमण्यांनी पाक संघ वैतागला, फॅन्सकडून प्रार्थना अन् पंतप्रधानांनी लावला जोर

T20 World Cup 2021, India vs Pakistan: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज सुपर-१२ च्या सामन्यांमध्ये आत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबईत महामुकाबला होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 3:28 PM

Open in App

T20 World Cup 2021, India vs Pakistan: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज सुपर-१२ च्या सामन्यांमध्ये आत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबईत महामुकाबला होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की वातावरण देखील चांगलंच तापतं. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पाकिस्तानकडून आजवर एकदाही पराभव झालेला नाही. भारतीय संघाचा हाच रेकॉर्ड यावेळी कायम राखण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानात मात्र वातावरण वेगळं आहे. पाकिस्तानात सध्या एकच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे भारताविरोधात विजय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत: पाकचा कर्णधार बाबर आझम याच्याशी या सामन्याआधी फोनवर संवाद साधला यातूनच भारतीय संघाविरुद्धच्या सामन्याचं महत्त्व लक्षात येतं. इतकंच काय तर पाकिस्तान क्रिकेटपटूंना भारतीय संघाला पराभूत केलं तर कॅश बोनस आणि ब्लँक चेक देण्याचीही भुरळ घालण्यात आली आहे. याशिवाय इतर अनेक भेटवस्तूंची घोषणा करण्यात आली आहे. भारताविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानकडून पूर्ण जोर लावला जात आहे. 

वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रेकॉर्ड पाहता १२-० असा राहिला आहे. भारतानं वर्ल्डकप स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरुद्ध निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. आतापर्यं दोन्ही देश वर्ल्डकप स्पर्धेत १२ वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत आणि सर्व लढतीत भारतानं विजय प्राप्त केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यावेळी हवा बदलेल आणि पाकिस्तान जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. गेल्याच महिन्यात इम्रान खान यांनी पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांची भेट घेतली होती आणि भारताविरुद्धच्या सामन्याबाबत चर्चा झाली होती. भारतीय संघाविरुद्ध सामन्याकडे लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला इम्रान खान यांनी रमीज राजा यांना दिला होता. त्यानंतर रमीज राजा यांनी पाक संघासोबत दोन सेशन व्यतित केले होते. भारतीय संघाला पराभूत करा असा स्पष्ट संदेश पाकच्या क्रिकेटपटूंना देण्यात आला आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App