कल्याण : भारत विरुद्ध श्रीलंकादरम्यान रविवारी झालेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावणा-या त्रिकूटाला खडकपाडा पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेने पश्चिमेतील गांधारी परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीतून अटक केली. आरोपींकडून तीन लाख २९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट सामन्यावर गांधारी परिसरातील महावीर व्हॅली इमारतीत सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे त्यांनी तेथे छापा टाकला. त्या वेळी हिरामल तलरेजा (रा. उल्हासनगर), त्याचा भाऊ मुकेश तलरेजा आणि हिरामलचा मुलगा अनिल तलरेजा हे सट्टा चालवत असल्याचे आढळले. एका वेबसाइटद्वारे हा सट्टा चालवला जात होता. विशेष म्हणजे सट्टेबाजांचा म्होरक्या दुबईतून व्यवहार सांभाळत होता. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एक लाखाची रोख रक्कम, काही लॅपटॉप, महागडे मोबाइल असा तीन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उल्हासनगर हा क्रिकेट सट्टेबाजांचा अड्डा आहे. परंतु, आता तेथील सट्टेबाजांनी कल्याणमध्ये आपला मोर्चा वळवला आहे. उच्चभ्रू इमारतीत जेथे सट्टा सुरू होता, ते घर कोणाचे आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. सोसायटीत सट्टा सुरू असल्याची जराही कल्पना तेथील रहिवाशांना नव्हती.