Join us  

'विराटकडून कर्णधारपद काढलंच पाहिजे' असं ठामपणे म्हणणाऱ्यांसाठी...

जगातील सर्वोत्तम फलंदाज. Greatest Batsman in the World. अर्थात विराट कोहली...

By स्वदेश घाणेकर | Published: July 17, 2019 1:19 PM

Open in App

- स्वदेश घाणेकर

जगातील सर्वोत्तम फलंदाज. Greatest Batsman in the World. अर्थात विराट कोहली... कॅप्टन कोहलीची प्रत्येक खेळी ही क्लासिक, विक्रमांना सहज आपल्या खिशात घालणारी. त्यानं एक धाव काढली तरी विक्रम अन् शंभर धावा केल्या तर महाविक्रम. त्यात जर धावांचा पाठलाग करायचा असल्यास त्याच्या अंगात संचारतं. मग समोर कोणताही दिग्गज गोलंदाज असो कोहलीनं त्याची धुलाई केलीच म्हणून समजा. भूकेला वाघ जसा हाती आलेल्या शिकाराला निर्दयपणे यमसदनी पाठवतो अगदी तसाच कोहली धावांचा पाठलाग करताना वाटतो. भूकेला वाघ...

पण वर्ल्ड कप ही अशी स्पर्धा आहे की जिथं वाघाची शेळी व्हायला वेळ लागत नाही. कोहलीच्या बाबतीत काहीसे तसेच झाले. त्याची शेळी झाली नाही पण तो वाघही राहिला नाही. कोहली आणि शतक हे घट्ट समीकरण. पण वर्ल्ड कप स्पर्धेत ते हरवले. सलग ४ की ५ अर्धशतकं केली, परंतु त्याचे शतकात रुपांतर तो करू शकला नाही. मुळात तशी संधी त्याला मिळाली का, हा प्रश्न आहे. वर्ल्ड कप मधील धावांचे सर्व विक्रम तो मोडेल अशा आत्मविश्वासाला तडा गेला. त्याच्या या अपयशाचा परिणाम हा संघाच्या कामगिरीवर झाला. पण, जे झाले ते बरेच झाले. त्यामुळे १, २, ३... नंतर संघाकडे उत्तम फलंदाज नाही हे सिद्ध झाले.

संघाला उपांत्य फेरीत २४० धावाही करता आल्या नाही आणि जेतेपदाचे प्रबळ दावेदारांचे पॅकअप झाले. कोहली फलंदाज म्हणू ग्रेट असला तरी कर्णधार म्हणून कधी ग्रेट जाणवला नाही. महेंद्रसिंग धोनीच्या छत्रछायेखाली त्याची ही कमतरता लपत आली. त्याच्या नेतृत्वगुणातील उणीवा जाणवत होत्या पण त्याचे असे भुर्दंड बसेल असा विचारही केला नव्हता. वर्ल्ड कप संपला, जेता ठरला आणि आपल्याकडे भारतीय संघात बदलाचे वारे वाहू लागले. कोहलीकडून कर्णधारपद काढून घ्या अशी मागणी होत आहे आणि तिही रोहित शर्माचं नाव पुढे करून.

आपण हरलो, याला एकटा कोहली जबाबदार, तो गटबाजी करतो, तो त्याच्याच माणसांना खेळवतो, Etc. अशा अनेक टीका झाल्या. तर यामागे थोडे फार तथ्य आहे, हे मान्य करायला हवं. पण म्हणून त्याला हटवा, हा हट्ट बालीश वाटतो. किंवा धोनीच्या निवृत्तीची चर्चा आहे म्हणून आकसापायी कोहली हटवा ही मोहीम उभी केली जात आहे, अशी शंका मनात येण्यावाचून राहत नाही. 

कोहलीच्याच नेतृत्वाखाली आपण ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. त्या मालिकांत तर तर अनेकदा कोहलीनेच एकहाती सामना खेचला आहे. आज आपण दूरदेशात असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला आपल मानतो. त्याचीही प्रतीमा कोहलीशी मिळतीजुळतीच आहे. मग कोहली द्वेश का ?

हा खेळ आहे आणि एक हरल्याशिवाय दुसरा पुढे जात नाही. मग जय पराजय हा या खेळाचा आत्माच आणि त्यानुसार भारत हरला. तो दिवस आपला नव्हताच. संघ निवड यात कर्णधाराचा महत्त्वाचा वाटा असतोच. पण कोणाचीच निवड प्रत्येकवेळी योग्य ठरलेली नाही. मग त्याला कोहली अपवाद कसा असेल. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ज्या कोहलीवर छातीठोकपणे विश्वास दाखवणारे आज त्याच्याच हकालपट्टीची मागणी करत आहेत. या खेळात आपण इतके भावनिक होतो की वर्तमानाचा विचारच करत नाही. सरळ टोकाची भूमिका घेऊन मोकळे होतो.

महान फलंदाज सचिन तेंडुलकरशी आपण नेहमी कोहलीची तुलना करतो. पण, हे लक्षात असूद्या तेंडुलकरलाही सहाव्या प्रयत्नात वर्ल्ड कप जिंकता आला होता. मग कोहलीवर दडपण कशाला लादताय? हे म्हणजे घराचे वासे फिरले अन् कोहलीकडून कर्णधारपद काढून घ्या, असं म्हणणे झाले.  

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयवर्ल्ड कप 2019