Join us  

तिसरी वनडे: बुमराहचा पॉवर पंच, भारताला विजयासाठी 218 धावांचे माफक आव्हान

बुमराहने केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलदाजांनी नांग्या टाकल्या. निर्धारित 50 षटकांत श्रीलंकेला 9 गड्यांच्या मोबदल्यात 217 धावा करता आल्या. भारताला विजयासाठी 218 धावांचे माफक आव्हान मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 2:11 PM

Open in App

पल्लिकल, दि. 27 - जसप्रीत बुमराहने केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलदाजांनी नांग्या टाकल्या. निर्धारित 50 षटकांत श्रीलंकेला 9 गड्यांच्या मोबदल्यात 217 धावापर्यंत मजल मारता आली. भारताला विजयासाठी 218 धावांचे माफक आव्हान मिळाले आहे. भारतीय गोलंदाजांनी आज टिचून मारा केला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोत तिसऱ्या वन-डे सामन्यात श्रीलंकेची अवस्था अतिशय बिकट झालेली पहायला मिळाली. लंकेच्या फलंदाजांना धावासाठी संघर्ष करवा लागला. एकामागोमाग एक विकेट जाण्याचं सत्र सुरु असतानाच थिरीमनेने लंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. थिरीमनेचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने मैदानावर टिकून भारतीय गोलंदाजीचा दीर्घकाळ सामना केला नाही. मात्र त्याला माघारी धाडण्यात जसप्रीत बुमराहला यश आलं. केदार जाधवकडे झेल देत तो माघारी परतला. थिरीमनने 105 चेंडूचा सामना करताना 80 धावांची खेळी केली. यापाठोपाठ थोड्याच अंतराने श्रीलंकेचा कर्णधार चमार कपुगेदरा अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर जसप्रीत बुमराहने अकिला धनंजयाचा त्रिफळा उडवत लंकेला आणखी अडचणीत ढकललं.बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी लंकेच्या फलंदाजावर वर्चस्व गाजवले. पहिल्या दोन धक्क्यातून लंका सावरेल असे वाटत असतानाच पांड्याने तिसरा धक्का दिला. दिनेश चंदीमल पांड्याच्या गोलंदाजीवर बुमराहकडे झेल देत माघारी परतला. त्याने 36 धावांची खेळी केली. दिनेश चंदीमल आणि थिरीमने व्यातिरिक्त एकाही फलंदाजाला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. ठराविक अंतरावर बळी गेल्यामुळे लंकेला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.  बुमराहने पाच फलंदाजांची शिकार केली तर पांड्या, केदार आणि पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.यजमान श्रीलंकेने तिस-या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. भारतीय संघ आज रविवारी तिस-या वन-डेत विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने उतरणार आहे. दुसरीकडे, लंकेपुढे प्रतिष्ठा वाचविण्याचे मोठे आव्हान आहे. विराट अँड कंपनीने पहिले दोन्ही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली. पुढील सामना जिंकल्यास ३-० अशी विजयी आघाडी होईल. अखेरचे दोन्ही सामने कोलंबोत खेळले जातील.

दुस-या वन-डेत १३१ धावांत ७ फलंदाज बाद झाल्यानंतरही भारताने शानदार विजय नोंदविला. याआधी भारतीय संघ २००२ मध्ये या मैदानावर खेळला होता. संघाच्या डावपेचांत कोहली कुठले बदल करतो, हे पाहावे लागेल. दुस-या वन-डेआधी कोहलीने युवा चेहºयांना संधी देणार, असे म्हटले होते. त्यानुसार अक्षर पटेल आणि यजुवेंद्र चहल कायम राहतील का, हे पाहणे रंजक ठरेल.

दुस-या वन-डेत फलंदाजीच्या क्रमात मोठे बदल झाले होते. लोकेश राहुल तिस-या आणि केदार जाधव चौथ्या स्थानावर आले होते. कोहलीचे हे डावपेच फसले होते. पुन्हा असे करावे, की जुन्याच क्रमवारीनुसार फलंदाजांना पाठवावे, अशा द्विधा मन:स्थितीत कर्णधार आहे.दुसरीकडे, मागच्या सामन्यातील भारताच्या घसरगुंडीमुळे लंकेच्याही मालिकेत पुनरागमनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; पण त्यासाठी नाणेफेकीचा कौल मोलाचा ठरेल. कोहलीने दौºयात सलग पाचव्यांदा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित आणि धवन यांच्या शतकी भागीदारीमुळेही मधल्या फळीत प्रयोग करता आले. येथे नाणेफेक जिंकताच डावपेचांत बदल करणे कोहलीला भाग पडू शकते. अंतिम एकादशमध्ये हार्दिक पांड्याच्या समावेशावर प्रश्नचिन्ह आहे.

 

टॅग्स :क्रिकेटविराट कोहली