मुंबई : आयपीएलच्या पुढील सत्रात दोन नव्या संघांची भर पडणार आहे. बीसीसीआय यासंदर्भात लवकरच घोषणा करणार असून नव्या संघांसाठी मूळ किंमत दोन हजार कोटी रुपये असेल. ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये खेळाडूंचा महालिलाव होणार असून जानेवारीत माध्य अधिकाराचाही लिलाव केला जाईल. नव्या संघांच्या शर्यतीत अहमदाबाद, पुणे, लखनऊ आणि इंदूर सर्वांत आघाडीवर आहेत.
याआधी मे महिन्यात दोन नवे संघ निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार होती, मात्र कोरोनामुळे लिलाव स्थगित झाला. बीसीसीआयपुढे सर्वात मोठे आव्हान नव्या संघाची मूळ किंमत ठरविणे हे असेल.
मागच्या वर्षीपर्यंत प्रत्येक संघाची मूळ किंमत १५०० कोटी ठेवण्याचा विचार सुरू होता, तथापि राजस्थान रॉयल्समध्ये झालेल्या बदलानंतर बोर्ड फेरविचार करीत आहे.
दोन हजार कोटी अशी किंमत ठरविली जाईल, असे संकेत मिळाले आहेत. पुढील पर्वापासून चार खेळाडूंना रिटेन करण्याची योजना येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खेळाडू रिटेन धोरण -
वृत्तानुसार खेळाडू रिटेन नियमात बदल होत आहे. आधी पाच खेळाडूंना रिटेन करण्यास मुभा होती. ती आता चारपर्यंत मर्यादित असेल. यात तीन भारतीय आणि एक विदेशी किंवा दोन भारतीय आणि दोन विदेशी असा पर्याय दिला जाईल. तीन खेळाडू रिटेन केल्यास फ्रॅन्चायजीच्या रकमेतून १५ कोटी, ११ कोटी आणि ७ कोटींची कपात केली जाईल. दोन खेळाडू घेतल्यास १२.५ आणि ८.५ कोटी कापले जातील. एक खेळाडू रिटेन केल्यास १२.५ कोटी कपात केली जाईल.
लिलावाचे नियम बदलणार?
- वेतनकॅप ८५ कोटींवरून
९० कोटींपर्यंत जाईल.
- दहा संघ असल्यास किमान ५० कोटी रुपये वेतन कॅपमध्ये जातील.
- फ्रॅन्चायजीला यापैकी
७५ टक्के रक्कम खर्च करावी लागेल.
- पुढील ३ वर्षांत अर्थात
२०२४ ला वेतन कॅप
१०० कोटींपर्यंत जाईल.
कोणत्या संघाची किती कोटींमध्ये विक्री
संघ किंमत
मुंबई इंडियन्स ८३३
रॉयल चॅलेंजर्स ८३१
डेक्कन चार्जर्स ७९७
चेन्नई सुपरकिंग्स ६७७
दिल्ली डेअरडेव्हिल्स ६२५
किंग्स इलेव्हन पंजाब ५६६
केकेआर ५५९
राजस्थान रॉयल्स ५००