पुणे : ‘मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना कसोटी क्रिकेटसाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल. तसेच, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी प्रथम विचार होईल,’ असे सांगत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी कसोटी व मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी भारतीय संघात विविध गोलंदाज खेळविण्यात येतील, असे संकेत दिले.
अरुण यांनी सांगितले, ‘शमी आणि यादव आमचे अव्वल कसोटी गोलंदाज आहेत. दुसरीकडे, भुवी आणि बुमराह हेदेखील चमकदार गोलंदाज असून त्यांच्याकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. सध्या भारत जास्त क्रिकेट खेळत असूंन याकडे पाहता आपल्याकडे गोलंदाजांचा एक चमू असणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक सामन्यात गोलंदाज तंदुरुस्त आणि प्रसन्नतेने खेळतील.’ त्याचबरोबर, ‘सध्या कसोटी सामने नसल्याने यादव आणि शमी दोघेही प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत असून शमीने बंगालकडून चमकदार कामगिरी केली आहे. खूप जास्त गोलंदाजी करणे, तसेच खूप कमी गोलंदाजी करणे हे कधीही धोकादायक असते.’