- जितेंद्र कालेकर ठाणे - भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावरील उपचारांमध्ये कोणतीही कमी भासू देणार नाही. त्यांच्या यापुढील उपचाराचा सर्व खर्च आपल्याकडून केला जाईल, असे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या कुटूंबीयांना बुधवारी दिले. सरनाईक यांनी भिवंडीतील रुग्णालयात त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. दरम्यान, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही त्यांच्या श्रीकांत फाऊंडेशनच्या वतीने त्यांना पाच लाखांची मदत देत असल्याचे जाहीर केले आहे.
कांबळी यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल केले आहे. या रुग्णालयास भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची सरनाईक यांनी विचारपूस केली. कांबळी हे भारतीय क्रिकेटमधील एक तेजस्वी नाव आहे, ज्यांनी आपल्या खेळाने देशाला अनेक गौरवाचे क्षण दिले. त्यांच्या डोळ्यांत अजूनही तीच जिद्द आणि लढण्याची उमेद दिसते, जी त्यांच्या खेळात नेहमीच दिसायची. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून लवकरच ते पूर्णपणे बरे होतील, असा विश्वास यावेळी सरनाईक यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला. यापुढे कांबळी यांच्या औषध व रुग्णालयाच्या उपचारांमध्ये कोणतीही कमी भासू देणार नाही असेही सरनाईक यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आश्र्वासित केले.