- रोहित नाईक
मुंबई : खेळामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. अनेकदा चांगल्या लयीमध्ये असताना एक चेंडू असा पडतो, ज्यावर तुम्ही बाद होता. हा खेळाचा भाग आहे. त्यामुळे मी अधिकाधिक सातत्य राखण्यासाठी मेहनत घेत आहे,’ असे मत मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने क्वालिफायर-२ पर्यंत धडक मारली. संघाच्या वाटचालीमध्ये सलामीवीर पृथ्वीने चांगले योगदान दिले. त्याने अनेकदा संघाला वेगवान सुरुवात करुन देताना मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. परंतु, चांगल्या सुरुवातीनंतरही त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. सध्या पृथ्वी मुंबई टी२० लीगमध्ये नॉर्थ मुंबई पँथर्सचे नेतृत्त्व करत आहे. येथेही संघाच्या पहिल्या सामन्यात आक्रमक सुरुवातीनंतर पृथ्वी झटपट बाद झाला.
याविषयी पृथ्वी म्हणाला की, ‘नेहमी एकाच पद्धतीने बाद झाल्यास आपण प्रश्न उपस्थित करु शकतो. पण अनेकदा चांगला चेंडू पडतो ज्यावर फलंदाज चकतो, किंवा काहीवेळा अनपेक्षितपणे धावबादही होतो. त्यामुळे यावर ठामपणे बोलता येणार नाही. हा खेळाचा एक भाग आहे. तुम्ही २-३ सामन्यांत अपयशी ठरता, पण त्यानंतर मात्र तुमच्याकडून मोठी खेळी नक्की होते. त्यामुळे मीदेखील सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे.’
आयपीएलनंतर घरच्या मैदानावर खेळताना फार वेगळं वाटत नसल्याचे सांगताना पृथ्वी म्हणाला की, ‘खेळाचा प्रकार सारखाच आहे. केवळ आता मुंबईत परतलोय याचाच आनंद अधिक आहे. लहानपणापासून येथे खेळलोय आणि अजूनही खेळतोय. त्यामुळे मुंबईत खेळण्याची भावनाच वेगळी असते. शिवाय या स्पर्धेतील सर्व खेळाडू चांगले मित्र असून आम्ही एकमेकांसोबत अनेक क्लब क्रिकेट सामने खेळले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा माझ्यासोबतच प्रत्येक मुंबईकर खेळाडूसाठी चांगली संधी आहे.’
मुंबई क्रिकेटमध्ये सिनिअर खेळाडू असलेला पृथ्वी म्हणतो की, ‘माझ्यामते जेव्हा संघ म्हणून विचार करतो, तेव्हा कोणीही सिनिअर-ज्युनिअर नसतो. आता नॉर्थ मुंबई संघात माझ्याहून वयाने मोठे खेळाडू आहेत. ४७ वर्षीय प्रवीण तांबे सर आहेत. त्यामुळे सिनियर-ज्यूनियर अस काही नसतं. माझ्यासाठी सर्व खेळाडू एकसमान आहेत. कर्णधार म्हणून मैदानावर जे माझे काम आहे, ते मी पार पाडणार. त्यावेळी नक्कीच सर्व खेळाडूंना मी काही सूचना देईन जे त्यांना ऐकावे लागेल.’