Join us  

सध्याच्या भारतीय संघात ‘रोल मॉडेल’ नाहीत - युवराज

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्या दोघांवर कारवाई करण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 5:08 AM

Open in App

नवी दिल्ली : सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील संस्कृतीविषयी सडेतोड उत्तर देत माजी अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या संघात ‘रोल मॉडेल’चा अभाव जाणवतो आणि सिनियर्सचा युवा खेळाडू फार सन्मान करीत नाहीत, अशी टीका युवराजने केली. ‘कॉफी विथ करण’या करण जोहरच्या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते.

या प्रकरणावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्या दोघांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणावरदेखील युवराजने सडेतोड मत मांडले. इन्स्टाग्रामवर युवराज लाईव्ह होता. रोहित शर्मा याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना युवराजने हार्दिक पांड्या प्रकरणावर भाष्य केले. पूर्वीच्या आणि आताच्या क्रिकेटपटूंमध्ये काय फरक वाटतो? असा सवाल रोहितने युवराजला केला. त्यावर युवराज म्हणाला, ‘पूर्वीचे खेळाडू अर्थात मी किंवा तू (रोहित) संघात नव्याने दाखल झालो, तेव्हा आपण वरिष्ठांचा आदर करायचो. आपल्या वागण्या-बोलण्यात वरिष्ठ खेळाडूंबाबत बोलताना विनम्रपणा होता. तुम्ही भारताचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करता याची जाणीव ठेवून पूर्वीचे खेळाडू वागायचे. कशाप्रकारे राहावे, मुलाखती देताना कसे बोलावे या सगळ्याची एक ठरलेली पद्धत होती.’

यापुढे रोहित म्हणाला, ‘मी संघात आलो तेव्हा पीयूष चावला, सुरेश रैना यांच्यासोबत मी युवा खेळाडू होतो. सध्याच्या संघातील ऋषभ पंत या युवा खेळाडूसोबत माझा संवाद सुरू असतो.’ (वृत्तसंस्था)‘पूर्वी खेळाडू आपल्या जबाबदाऱ्या ओळखून वर्तणूक करायचे. पण आताचे खेळाडू मात्र काहीसे वाहवत जातात आणि त्यामुळे सारेच गणित बिघडते. हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलचा ‘कॉफी विथ करण’मधील प्रसंग आमच्यावेळच्या क्रिकेटपटूंकडून घडला नसता,’ असे मत युवराजने व्यक्त केले.

टॅग्स :युवराज सिंग