...तर मग गोलंदाजही हेल्मेट घालून खेळतील

फलंदाजाप्रमाणे गोलंदाजांच्या सुरक्षेसाठीही प्रयत्न केले पाहिजेत अशी चर्चा सुरु आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 12:39 PM2018-02-23T12:39:33+5:302018-02-23T12:40:58+5:30

whatsapp join usJoin us
... then the bowlers will also wear helmets | ...तर मग गोलंदाजही हेल्मेट घालून खेळतील

...तर मग गोलंदाजही हेल्मेट घालून खेळतील

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - नुकतंच न्यूझीलंडच्या स्थानिक सामन्यात अंगावर शहारा आणणारा एक क्रिकेट शॉट पहायला मिळाला होता. फॉर्ड ट्रॉफीतील एका सामन्यात ऑकलंडच्या संघाकडून खेळताना फलंदाज जीत रावल याने कॅंटरबरी संघाचा गोलंदाज आणि कर्णधार अॅंड्रू एलिस याने टाकलेल्या एका चेंडूवर जोरदार प्रहार केला. आक्रमक खेळत असलेल्या जीत रावलने हा शॉट थेट गोलंदाजाच्या दिशेने मारला होता. शॉटचा वेग इतका जास्त होता की गोलंदाज एलिसने स्वतःच्या बचावासाठी खाली वाकण्याचा प्रयत्न केला. पण क्षणार्धात चेंडू एलिसच्या डोक्यावर बरोबर मधोमध येऊन आदळला आणि आश्चर्यकारकरित्या उडून सीमारेषेपार गेला. अंपायरने पहिले चौकार असल्याचा इशारा केला पण लगेच बदलून षटकार असल्याचं स्पष्ट केलं.  

ज्यावेळी हा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावर जाऊन आदळला तेव्हा मैदानातील खेळाडू आणि प्रेक्षकांसहित सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र इतक्या जोरात चेंडू लागूनही अॅंड्रू एलिसला काहीच झालं नाही. अॅंड्रू एलिसला काही झालं नसल्याचं पाहून सर्वांच्या जीवात जीव आला. अॅंड्रू एलिस काही वेळासाठी मैदानाबाहेर गेला आणि तपासणी झाल्यानंतर त्याला पुढे खेळण्यासाठी फिट घोषित करण्यात आलं. मात्र यामुळे एक नवी चर्चा सुरु झाली असून वाद-विवाद सुरु झाला आहे. फलंदाजाप्रमाणे गोलंदाजांच्या सुरक्षेसाठीही प्रयत्न केले पाहिजेत अशी चर्चा सुरु आहे. गोलंदाजानेही फलंदाजाप्रमाणे हेल्मेट घालून गोलंदाजी केली पाहिजे का ? असा प्रश्न विचारला जात आहे. 

क्रिकेट चाहत्यांना न्यूझीलंडचा स्थानिक क्रिकेटर वॉरेन बार्न्स नक्की माहित असेल. गतवर्षी डिसेंबर महिन्यात वॉरेन बार्न्स चर्चेत आला होता, जेव्हा त्याने खास हेल्मेट घालून गोलंदाजी केली होती. वॉरेन बार्न्स टी-20 सुपरस्मॅश टुर्नामेंटमध्ये हेल्मेट घालून गोलंदाजी करताना दिसला होता. वॉरेन बार्न्सने घातलेलं हेल्मेट एका मास्कप्रमाणे होतं. या हेल्मेटमुळे डोकं सुरक्षित राहत होतं. 

एलिसच्या डोक्यावर लागलेल्या चेंडूसंबंधी बोलताना वॉरेन बार्न्सने आता गोलंदाजांसाठी हेल्मेट अनिवार्य केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. गोलंदाजांची सुरक्षा लक्षात घेतला लवकरच क्रिकेटमध्ये हा नियम अंमलात आणला जाईल अशा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. वॉरेन बार्न्सने  एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत, गोलंदाजी करताना गोलंदाजाचं लक्ष चेंडूवरुन हटतं ज्यामुळे चेंडू वेगाने त्याच्या दिशेने आल्यास बचाव करणं शक्य नसतं ज्यामुळे जखमी होऊ शकतो असं म्हटलं आहे. 

'मी अपेक्षा करतो की, या घटनेनंतर जास्तीत जास्त गोलंदाज आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापराला पसंती देतील. टी-20 क्रिकेट सुरु झाल्यापासून अनेक फलंदाज सतत चेंडूवर प्रहार करत असतात. अशा परिस्थितीत गोलंदाजांची सुरक्षा महत्वाची आहे', असं त्याने सांगितलं आहे. 

Web Title: ... then the bowlers will also wear helmets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.