Join us  

स्पॉट फिक्सिंगमध्ये ५ वर्षांची शिक्षा भोगलेला खेळाडू पाकिस्तानचा संघ निवडणार आहे, PCB चा निर्णय

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये उलथापालथ पाहायला मिळतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 4:36 PM

Open in App

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये उलथापालथ पाहायला मिळतेय. पाकिस्तान संघाच्या कर्णधारापासून ते संचालक, प्रशिक्षक, मुख्य निवडकर्त्यापर्यंत सगळेच बदलले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB)  अनेक मोठे निर्णय घेतले. बाबर आजमने कर्णधारपद सोडल्यानंतर शान मसूदला कसोटी कर्णधार आणि शाहीन आफ्रिदीला ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले. माजी स्टार गोलंदाज वहाब रियाझकडे मुख्य निवड समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. 

मोहम्मद हाफिजची पाकिस्तानच्या पुरुष संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. पाकिस्तान क्रिकेटमधील बदलांच्या या मालिकेत बोर्डाने स्पॉट फिक्सिंगची शिक्षा भोगलेल्या खेळाडूवरही मोठी जबाबदारी टाकली आहे. पाकिस्तान क्रिकेटवर डाग आणणारा माजी कर्णधार सलमान बट आता वहाब रियाझला पाकिस्तानचा संघ निवडण्यात मदत करणार आहे. बट, कामरान अकमल आणि राव इफ्तिखार अंजुम यांची रियाझ यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा राष्ट्रीय निवड समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पुढील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला.

पाच वर्षांची बंदी होती३९ वर्षीय बट स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात पाच वर्षांच्या बंदीनंतर २०१६ मध्ये क्रिकेटमध्ये परतला. २०१० मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी सलमान बटवर बंदी घालण्यात आली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो खूप यशस्वी झाला, परंतु बंदीतून परतल्यानंतर त्याला पाकिस्तान संघात स्थान मिळवता आले नाही. २००३ ते २०१० दरम्यान, त्याने पाकिस्तानसाठी ३३ कसोटी सामन्यांमध्ये १८८९ धावा, ७८ वन डे सामन्यांमध्ये २७२५ धावा आणि २४ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये ५९५ धावा केल्या. 

सध्या पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. त्यासाठीचा पाकिस्तानचा १८ सदस्यीय संघ - शान मसूद ( कर्णधार), आमीर जमाल, अब्दुल्लाह शफीक, अब्रार अहमद, बाबर आजम, फहीम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्रम शहजाद, मिर हम्झा, मोहम्मद रिझवान ( यष्टिरक्षक), मोहम्मद वसीम ज्यु., नोमन अली, सईम आयुब, सलमान अली आघा, सर्फराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी  

 

 

टॅग्स :पाकिस्तानऑफ द फिल्ड