- मतीन खान
... तर अशा प्रकारे नवख्या गुजरातच्या विजेतेपदाने आयपीएलच्या पंधराव्या पर्वाची सांगता झाली. रविवारी आपण सगळ्यांनी बघितले की, कशाप्रकारे जोस बटलरवर बक्षिसांचा वर्षाव झाला. जवळपास ५० लाख रुपयांची बक्षिसे एकट्या बटलरने पटकावली, पण यावेळी माझ्या मनात एक विचार आला की, टी २० हा क्रिकेटचा प्रकार जरी फलंदाजांच्या बाजूने अधिक असला, तरी त्यात रंजकता आणण्यात गोलंदाजांचाही तितकाच वाटा राहिलेला आहे.
गुजरात संघाचेच बघा ना, त्यांनी अंतिम सामन्यासह संपूर्ण सत्रातच दमदार फलंदाजीसोबत उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, या संघाला घडविण्यात महत्त्वाचा वाटा राहिला, तो भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याचा. कारण भारताच्या या डावखुऱ्या गोलंदाजाने गुजरात संघामध्ये विजयाची भूक निर्माण केली, शिवाय त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात मोलाची भूमिका बजावली. नेहरा हा त्याच्या काळातला टी २० विशेषज्ञ गोलंदाज होता. त्याची गोलंदाजी अनेकदा फलंदाजांना बुचकाळ्यात टाकायची. स्ट्रीट स्मार्ट क्रिकेटर म्हणून नेहराला ओळखले जाते. कारण गोलंदाजीत गरजेनुसार काय बदल करायचे आणि प्रभावी मारा कसा करायचा, याची नेहराला चांगली जाण आहे. याच अनुभवाच्या आधारे त्यांनी गुजरातच्या गोलंदाजांना तयार केले. त्यांच्यात विजीगिषू वृत्ती भिनवली.
अनेकदा हा गैरसमज असतो की, टी २० हा केवळ चौकार आणि षटकारांचा खेळ आहे. मात्र, हे चुकीचे आहे. कारण या प्रकारात खेळत असताना तुमच्यात चाणाक्ष वृत्ती असणे गरजेचे असते. कारण मैदानावर योग्य रणनीतीच्या आधारे अचूक व्यूहरचना कशी आखायची, याचे कसब खेळाडूंकडे असायला हवे. मुख्य म्हणजे, हे गुण फलंदाजांपेक्षा गोलंदाजांमध्ये जास्त असणे जास्त गरजेचे. कारण टी २०मध्ये पावलोपावली त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागत असते. मला वाटतं, गुजरातच्या गोलंदाजांनी या गुणांना लगेच आत्मसात केले आणि त्याची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणीही केली.
गोलंदाज सामने डाव षटके निर्धाव धावा बळी सर्वोत्कृष्ट सरासरी इकॉनॉमी स्ट्राईक रेट
शमी १६ १६ ६१ ० ४८८ २० ३/२५ २४.४ ८ १८.३
राशीद १६ १६ ६३.३ ० ४२१ १९ ४/२४ २२.१५ ६.५९ २०.०१
फर्ग्युसन १३ १३ ४७.४ ० ४२७ १२ ४/२८ ३५.५८ ८.९५ २३.८
दयाल ९ ९ ३२ ० २९६ ११ ३/४० २६.९ ९.२५ १७.४
हार्दिक १५ १० ३०.३ ० २२२ ८ ३/१७ २७.७५ २७.२७ २२.८
जोसेफ ९ ९ ३० ० २६४ ७ २/३४ ३७.७१ ८.८ २५.७
एकूण - - २६४.४ ० २११८ ७७ - २९.०८ ८.०१ २१.३३