कोलंबो : अखेरच्या चेंडूवर मारलेला षटकार माझ्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण ठरला, अशी प्रतिक्रिया टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध विजयाचा शिल्पकार दिनेश कार्तिक याने दिली.
कार्तिकने यासह ऋषिकेश कानिटकर व जोगिंदर शर्मा यांच्या पंक्तीत स्थान मिळविले आहे. कानिटकरने पाकविरुद्ध १९९८ मध्ये ढाका येथे इन्डिपेंडन्स कपच्या अंतिम सामन्यात अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून भारताला विजयी केले होते. जोगिंदरने २००७ च्या टी-२० विश्वचषकात पाक कर्णधार मिस्बाह उल हक याला बाद करीत भारताला जगज्जेते बनविले होते.
कार्तिकने जावेद मियांदादच्या आठवणींना उजाळाही दिल्या. मियांदादने शारजात भारताविरुद्ध अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून पाकला विजयी केले होते. कार्तिक बीसीसीआय म्हणाला, ‘हा अविस्मरणीय क्षण आहे. माझ्या रोमारोमात या क्षणाची आठवण आयुष्यभर राहील. माझ्या कारकीर्दीत यावर्षी अनेक चढउतार आले. स्पर्धा जिंकण्यात माझे योगदान राहिले याबद्दल स्वत:ला धन्य समजतो.’
सोशल मिडियावर ‘कार्तिक’ महोत्सव
दिनेश कार्तिकने रविवारी रात्री भारताला बांगलादेशविरुद्ध थरारक विजय मिळवून दिल्यानंतर लगेच सोशल नेटवर्कवर कार्तिकवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. अनेक विविध पोस्ट नेटीझन्सनी शेअर केल्याने सोशल नेटवर्किंग कार्तिकमय झाली होती.
या एका धमाकेदार खेळीच्या जोरावर एरवी फारशा चर्चेत नसलेला कार्तिक एका रात्रीत भारतीय क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत झाला. त्याचवेळी, नेटीझन्सनी भारतीय संघाचे अभिनंदन करतानाच बांगलादेशच्या संघाची टेरही खेचली. त्याचबरोबर त्यांच्या झुंजार खेळीला सलामही केला.