Join us

ठाणे ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धा: स्पोर्टिंग क्लब कमिटीने जेतेपद राखले!

निर्णायक लढतीत क्लब कमिटीने ११२ धावांचे आव्हान १३.५ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि जेतेपद कायम राखले.

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: April 17, 2024 15:29 IST

Open in App

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शताब्दी वर्ष साजरे करत असलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने विरारच्या अमेय स्पोर्ट्स अकॅडेमीचा तब्बल आठ गडी राखून दणदणीत पराभव करत संदीप दहाड अकॅडेमी आयोजित १२ वर्षे वयोगटाच्या १५ षटकांच्या ठाणे ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. निर्णायक लढतीत क्लब कमिटीने ११२ धावांचे आव्हान १३.५ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि जेतेपद कायम राखले.

सेंट्रल मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत अमेय स्पोर्ट्स अकॅडेमीने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात ११२ धावा केल्या होत्या. सोहम पलईने ४२ धावांची खेळी करत संघाच्या शतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. कौशिक साळुंखेने दोन, अतुल चौधरी आणि अर्णव पांडेने प्रत्येकी एक गडी बाद केला. स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या अनुज चौधरीने या सामन्यातही आपली छाप पाडताना नाबाद ६८ धावा करत संघाला लागोपाठ दुसऱ्या वर्षी विजयी करण्यात मोलाची कामगिरी बजावली. कर्णधार आरुष खंदारेने २० धावा बनवल्या.

त्याआधी क्लब कमिटीने उपांत्य फेरीत माटुंगा जिमखान्याच्या ९ गडी राखून फडशा पाडला होता. अर्णव वाणीने ३ गडी बाद करत माटुंगा जिमखान्याला १५ षटकात ७ बाद ८८ धावांवर रोखले होते. त्यांनतर अर्णव चौधरीने नाबाद ४१ आणि आरुष खंदारेने ३१ धावा बनवत ११.४ षटकात १ बाद ८९ धावांसह संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले होते. स्पोर्टींग क्लब कमिटीच्या १२ वर्षाखालील संघाचे या मोसमातील हे दुसरे विजेतेपद आहे. शताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित केलेल्या १२ वर्ष वयोगटाच्या स्पर्धेत यजमान संघ विजयी ठरला होता. एल्फ वेंगसरकर अकॅडेमी आयोजित ड्रीम इलेव्हन स्पर्धेत या संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. याशिवाय त्यांच्या १६ वर्षांखालील संघानेहि शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेत बाजी मारली होती. यजमान स्पोर्टींग क्लब कमिटीने त्या स्पर्धेत एसपी ग्रुप क्रिकेट क्लबचा पराभव केला होता.

संक्षिप्त धावफलक:

अमेय स्पोर्ट्स अकॅडेमी- १५ षटकांत ७ बाद ११२ (सोहम पलई ४२, कौशिक साळुंखे ३-०-१५-२, अतुल चौधरी ३-०-२५-१, अर्णव पांडे २-०-१३-१) पराभूत विरुद्ध स्पोर्टिंग क्लब कमिटी- १३.५ षटकांत २ बाद ११६ (अनुज चौधरी नाबाद ६८, आरुष खंदारे २०)

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू (सर्व विजेते स्पोर्टिंग क्लब कमिटीचे).

  • सर्वोत्तम फलंदाज- अनुज चौधरी
  • सर्वोत्तम गोलंदाज- अर्णव वाणी (७ विकेट्स)
  • सर्वोत्तम क्षेत्ररक्षक- अतुल चौधरी
  • सर्वोत्तम कर्णधार- आरुष खंदारे

 

टॅग्स :ठाणे