Join us  

इंग्लंड दौऱ्यामध्ये आता आव्हान कसोटी मालिकेचे...

इंग्लंडने भारताविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 3:14 AM

Open in App

-अयाझ मेमनइंग्लंडने भारताविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. पहिला सामना जिंकला होता भारताने, त्यानंतर इंग्लंडने दुसरा सामना जिंकून बरोबरी केली आणि नंतर निर्णायक सामना जिंकून मालिकेवर कब्जा केला. आतापर्यंत या दौºयातील कामगिरीवर नजर टाकल्यास दोन्ही संघांनी एकमेकांना बरोबरीची टक्कर दिल्याचे पाहायला मिळेल. भारताने सर्वप्रथम टी२० मालिका जिंकली. त्यानंतर इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली. पण माझ्या मते कसोटी मालिका सुरू होण्याआधी आता इंग्लंडची बाजू थोडी वरचढ झाली आहे.भारताने भलेही टी२० मालिका जिंकली, तरी टी२० सामने हे एक प्रकारचे लॉटरीप्रमाणे असते. एकाची जरी बॅट तळपली किंवा कोणाचीही गोलंदाजी अचूक ठरली तरी सामना जिंकता येतो. त्या तुलनेत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे महत्त्व जास्त होते. कारण या मालिकेनंतर पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. त्यामुळे जो कोणता संघ यात बाजी मारेल त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि महत्त्वाचे म्हणजे ते विजयी लयीत असतील. दुसरी गोष्ट म्हणजे, पुढील वर्षी इंग्लंडमध्येच एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक रंगणार आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने संघ बांधणी म्हणून टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची होती.पण सर्वकाही अनपेक्षित घडल्याने भारताच्या पदरी निराशा आली आहे. अजूनही चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हे निश्चित झालेले नाही. त्याचबरोबर पाचव्या क्रमांकाचाही प्रश्न अजून सुटलेला नाही. सलामीवीरांविषयी म्हणायचे झाल्यास रोहित शर्माने पहिल्या सामन्यात शतक ठोकले, पण त्यानंतर तो अपयशी ठरला. शिखर धवन प्रत्येक सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. पण मोठी खेळी करण्यात त्याला यश आले नाही. तसेच, अनुभवी महेंद्रसिंग धोनीही अडखळताना दिसला. आपल्या सर्वांना माहितेय धोनी कशा प्रकारे खेळतो. त्याच्या आक्रमकतेची सर्वांनाच कल्पना आहे. पण ती आक्रमकता येथे दिसून आली नाही. प्रत्येक सामन्यात त्याने योगदान नक्की दिले, पण संघाला विजयी करण्यात त्याला यश आले नाही. विराट कोहलीचा अपवाद वगळता कोणाकडूनही म्हणावे तसे योगदान मिळालेले नाही. अष्टपैलू हार्दिक पांड्याही अपयशी ठरला. याच कमजोरीचा इंग्लंडला फायदा झाला आणि त्यांनी मालिका जिंकली.इंग्लंडला त्यांच्या यशाचे श्रेय द्यावे लागेल. जे फलंदाज सुरुवातीला कुलदीप यादवविरुद्ध खेळू शकले नाहीत, त्यांनी नंतर त्याला फारसे यश मिळू दिले नाही. तिसºया सामन्यात तर कुलदीपला एकही बळी मिळाला नाही. यावरून दिसून येते की इंग्लंडने कशा प्रकारे तयारी केली होती. इंग्लंडचे वेगवान आणि फिरकी गोलंदाज भारतीय फलंदाजांवर भारी पडले. यावरून इंग्लंड एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी का आहे, हे कळाले. तसेच आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताला संभाव्य विजेते मानले जात होते, पण आता इंग्लंड संभाव्य विजेते असून भारतासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.शिवाय आता कसोटी मालिकेसाठीही इंग्लंडची बाजू मजबूत दिसत आहे. त्यांचे अनेक फलंदाज फॉर्ममध्ये आले आहेत. त्यातल्या त्यात मर्यादित षटकांमध्ये चमकलेले आदिल राशिद आणि मोहन अली कसोटी मालिकेत खेळणार नाहीत, हीच भारतासाठी दिलासादायक बाब ठरेल. भारतासाठी भुवनेश्वरचा फॉर्म चिंतेचा विषय ठरत आहे. जसप्रीत बुमराह अजूनही पूर्ण तंदुरुस्त नाही. फलंदाजीमध्येही कोहलीव्यतिरिक्त कोणाच्याही खेळीत सातत्य नाही. त्यामुळे आता चेतेश्वर पुजारा, मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांची कामगिरी कशी होणार हे पाहावे लागेल.(संपादकीय सल्लागार)

टॅग्स :अयाझ मेमन