Join us  

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका: विंडीजचे खेळाडू लावणार ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ लोगो

क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाला थारा नको. डोपिंग आणि भ्रष्टाचार याप्रमाणे वर्णद्वेष हादेखील गुन्हाच असल्याचे मत होल्डरने व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 12:59 AM

Open in App

मॅन्चेस्टर : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात ८ जुलैपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेत विंडीजचे खेळाडू अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांकडून झालेल्या हत्येविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ लोगो वापरणार आहेत. वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने म्हटले आहे.

आयसीसीने या लोगोसाठी विंडीज संघाला परवानगी दिली असून, खेळाडूंच्या टी-शर्टवर हा लोगो असेल. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हा महत्त्वाचा दौरा आहे. ही मालिका जिंकणे आमचे उद्दिष्ट आहे, त्याचवेळी जगभरात वर्णद्वेषावरून काय घडामोडी सुरू आहेत याकडेही आमचे लक्ष आहे. लोगो लावण्याचा निर्णय आम्ही सहज घेतलेला नाही. आमच्या कातडीच्या रंगावर कुणी हल्ला चढवत असेल तर काय वाटते, हे अनुभवले असल्यामुळेच समानता प्रस्थापित होईपर्यंत विरोध कायम असेल,’असे होल्डरने ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले.

क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाला थारा नको. डोपिंग आणि भ्रष्टाचार याप्रमाणे वर्णद्वेष हादेखील गुन्हाच असल्याचे मत होल्डरने व्यक्त केले.विंडीजचे खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाले असून त्यांनी १४ दिवसांचे विलगीकरण पूर्ण केले. कोरोना प्रादुर्भावाची भीती लक्षात घेता आयसीसीने लॉकडाऊन पश्चात क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे नवीन नियमांसह ही मालिका रंगणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :इंग्लंडवेस्ट इंडिज