Join us  

आता नव्या कर्णधाराची कसोटी, कोहलीने मायदेशी रवाना होण्याआधी अजिंक्य रहाणेकडे सोपविली जबाबदारी 

india vs australia : ॲडिलेडच्या पहिल्या कसोटीत भारताची जी दाणादाण झाली ती पाहता नवा कर्णधार रहाणेपुढे आव्हानांचा डोंगर असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 1:52 AM

Open in App

नवी दिल्ली : बॉर्डर- गावसकर ट्रॉफी मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यात नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवून नियमित कर्णधार विराट कोहली मंगळवारी भारताकडे रवाना झाला. ॲडिलेडच्या पहिल्या कसोटीत भारताची जी दाणादाण झाली ती पाहता नवा कर्णधार रहाणेपुढे आव्हानांचा डोंगर असेल.मोहम्मद शमी देखील जखमी झाल्याने मालिकेतून बाहेर पडला. याचा अर्थ रहाणेसाठी कुठलीही बाब दिलासादायी दिसत नाही. त्याच्या जमेची एकच बाब अशी की याआधी त्याच्या नेतृत्वात खेळलेले दोन्ही कसोटी सामने भारताने जिंकले आहेत.योगायोग असा की दोनपैकी एक कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्धच होता.धर्मशाळा येथे हा सामना झाला होता. भारताने रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर सामन्यात बाजी मारली होती.२०१७ च्या या मालिकेत कोहली जखमी झाल्यामुळे अजिंक्य रहाणे कार्यकारी कर्णधार होता. तो आगळ्यावेगळ्या निर्णयामुळे चर्चेतही आला होता. रहाणेने कोहलीच्या जागी कुलदीप यादवचा समावेश करण्याचा ‘बोल्ड निर्णय’ त्यावेळी घेतला.एका फलंदाजाऐवजी गोलंदाजाला संघात खेळविण्याच्या निर्णयामुळे क्रिकेट पंडित हैराण झाले होते. कुलदीपने मात्र भारताकडून चार गडी बाद करीत रहाणेचा धाडसी निर्णय योग्य ठरविला होता. यानंतर रहाणेने २०१८ ला दुसऱ्यांदा अफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक सामन्यात देशाचे नेतृत्व केले. हा सामना एकतर्फी असाच होता. अपेक्षेनुरुप भारताने सहज बाजी मारली. 

३२ वर्षांचा रहाणे विदेशात पहिल्यांदा देशाचे नेतृत्व करीत आहे. त्याच्याकडे पहिल्या सामन्यातील पराभवामुळे आत्मविश्वास खचलेला संघ आहे.तथापि उजव्या हाताच्या या चिवट फलंदाजाला आव्हानांचा सामना करणे आवडते. प्रतिकूल स्थितीत रहाणेचा खेळ बहरतो. गोलंदाजांना पूरक असलेल्या खेळपट्टीवर स्थिरावणे आणि चिवट धावा काढण्याचे कौशल्य त्याच्या खेळात आहे. गरजेनुसार वेगवान धावा काढण्यातही त्याचा हातखंडा आहेच. भारतीय चाहत्यांच्या या नव्या कर्णधाराकडून फार अपेक्षा असतील. पहिले आव्हान असेल ते फलंदाजीतील कामगिरी सुधारण्याचे. सामना जिंकून मालिकेत बरोबरीही करायची आहे. त्यासाठी सहकाऱ्यांमध्ये विजिगिषु वृत्तीचा संचार करावा लागेल.रहाणे आपल्या नव्या जबाबदारीत किती यशस्वी होईल, हे येणारा काळच सांगणार आहे.

सहकाऱ्यांना धीर देत कोहली भारताकडे रवानाॲडिलेड : भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातील सहकाऱ्यांना धीर देत मंगळवारी भारताकडे प्रस्थान केले. जानेवारीत होणाऱ्या बाळाच्या जन्मासाठी कोहलीने पितृत्व रजा घेतली आहे. परतण्याआधी त्याने सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली.दुसऱ्या कसोटीसाठी सकारात्मक मानसिकेतेने मैदानावर उतरा. आत्मविश्वास ढळू देऊ नका, असा त्याने प्रत्येकाला सल्ला  दिला. भारताने पहिला सामना तीन दिवसात गमावला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेविराट कोहली