Join us

सीओएने अखेर तयार केल्या सीएसीसाठी कार्यक्षेत्राच्या अटी

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या कथित हित जोपासण्याच्या मुद्यावर जैन यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:01 IST

Open in App

नवी दिल्ली : प्रशासकांच्या समितीने (सीओए) अखेर तीन सदस्यांच्या क्रिकेट सल्लागार समितीसाठी (सीएसी) कार्यक्षेत्राच्या अटी तयार केल्या आहेत. बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी.के. जैन यांनी हित जोपासण्याच्या मुद्यावर निर्णय दिल्यानंतर सीएसीला याबाबत माहिती सोपविण्यात येईल. बीसीसीआयची निवडणूक २२ आॅक्टोबर रोजी होणार असून,कार्यक्षेत्राच्या अटी त्या कालावधीपर्यंत वैध मानल्या जातील.

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या कथित हित जोपासण्याच्या मुद्यावर जैन यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत. सचिनने २०१५ मध्येच कार्यक्षेत्राच्या अटी निश्चित करण्यास सांगितले होते.

बीसीसीआयमधील अनेकांचे मत आहे की, जर सीओएने या प्रकरणात ढिलाईपणा दिला नसता, तर एमपीसीए सदस्य संजीप गुप्ता यांना तक्रार अर्ज करता आला नसता. बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘कार्यक्षेत्राच्या अटी तयार आहेत. न्यायमूर्ती जैन यांनी आपला निर्णय दिल्यानंतर तीन सदस्यांच्या समितीला लिखित स्वरूपात या अटींची माहिती देण्यात येईल. समिती बीसीसीआयच्या आमसभेपर्यंत काम करेल. गेल्या चार वर्षांपासून सचिन या अटींबाबत बोलत होता.’

अधिकारी पुढे म्हणाले, ‘ज्यावेळी अनुराग ठाकूर अध्यक्ष झाले त्यावेळी सचिनने आपल्या कार्यक्षेत्राच्या अटींबाबत स्पष्टीकरण मागितले होते. आता दोन वर्षांपासून सीओए आहेत आणि त्यामुळे हा सर्व गोंधळ आहे. जर सचिनला त्यासाठी वाईट वाटत असेल, तर त्यासाठी त्याला दोष देता येणार नाही, पण सर्व शंका लवकरच दूर होतील, अशी आशा आहे.’हे तिघे आपल्या पदावर कायम राहिले, तर विश्वचषक स्पर्धेनंतर वरिष्ठ राष्ट्रीय संघासाठी प्रशिक्षकांची मुलाखत घेणे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काम राहील. (वृत्तसंस्था)