Join us  

नेदरलँडच्या आश्चर्यकारक विजयाचं सचिनकडून कौतुक; झुंजार खेळाडूची थोपटली पाठ

२४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला साजेशी सुरुवात करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 8:45 AM

Open in App

ICC ODI World Cup SA vs NED Live : नोव्हेंबर २०२२ मध्ये नेदरलँड्सने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून त्यांना स्पर्धेबाहेर फेकले होते. या पराभवाची जखम भरून येतेय, तोच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सने पुन्हा एकदा आफ्रिकेवर लक्षवेधी विजय मिळवला. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सच्या कृपेने नेदरलँड्सने सन्मानजनक पल्ला गाठला अन् त्यानंतर डच गोलंदाजांनी कहर केला. त्यामुळे, आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम करण्यात नेदरलँडला यश आले. या विजयानंतर टीम नेदरलँडचं सर्वत्र कौतुक होत आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही नेदरलँड आणि कर्णधाराचे कौतुक केलं आहे. 

२४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला साजेशी सुरुवात करता आली नाही. कॉलिन आर्कमनच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात क्विंटन डी कॉक (२०) माघारी परतला अन् आफ्रिकेला ३६ धावांवर पहिला धक्का बसला. आफ्रिकेचाच माजी खेळाडू मर्वेने १०व्या षटकात टेम्बा बवुमाचा (१६) त्रिफळा उडवून आफ्रिकेची गोची केली. त्याल पॉल व्हॅन मीकेरनने फॉर्मात असलेल्या एडन मार्करामचा त्रिफळा उडवला. रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला (४) त्याचा चुकीचा फटका महागात पडला आणि मर्वेच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. हेनरिच क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी डाव सावरला होता, परंतु व्हॅन बीकने पाचवा धक्का दिला. क्लासेन २८ धावांवर बाद झाला. आफ्रिकेला १५ षटकांत ११७ धावांची गरज होती, परंतु त्यांचे केवळ ४ फलंदाज शिल्लक होते. मिलर आणि गेराल्ड कोएत्झी यांनी ३६ धावांची भागीदारी करून आशा जागवल्या होत्या, परंतु व्हॅन बीकने ३१व्या षटकांत मिलरचा ( ४३) त्रिफळा उडवला अन् आफ्रिकेचा पराभव जवळपास निश्चित केला. त्यानंतर आफ्रिकेचा डाव गडगडला आणि नेदरलँड्सने धक्कादायक विजय मिळवला.

नेदरलँडच्या या विजयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सचिन तेंडुलकरनेही या आश्चर्यकारक विजयानंतर नेदरलँडच्या टीमचं आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्सच्या खेळीचं कौतुक केलंय. यंदाचा विश्वचषक मनोरंजक निकाल देत आहे. एका टप्प्यावर 140/7 अशी दयनीय अवस्था असताना कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने लढाऊ खेळी करत संघाला साजेशी खेळी केल्याचं पाहून आनंद झाला. 

मैदानात मला त्यांच्याबद्दल सर्वात आनंदाची गोष्ट ही वाटली की, डचच्या संघाने आफ्रिकेच्या फलंदाजांना कायम दडपणात ठेवले, एक-एक धाव घेतानाही त्यांना संघर्ष करावा लागला. म्हणूनच, कालचा विजय आणि ही रात्र त्यांच्यासाठी सस्मरणीय ठरणार आहे, असे सचिनने म्हटले. 

कर्णधार स्कॉट एडवर्डसने सावरला डाव

आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर नेदरलँड्सचा निम्मा संघ ८२ धावांवर तंबूत परतला होता. पण, कर्णधार स्कॉट एडवर्ड्स आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर खंबीरपणे उभा राहिला. त्याला सायब्रँड इगलब्रेच ( १९),  तेजा निदामानुरू ( २०) , रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे ( २९) यांची साथ मिळाली. एडवर्ड्स आणि मर्वे यांनी ८व्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. आर्यन दत्तने ९ चेंडूंत ३ षटकारांसह नाबाद २३ धावा केल्या. एडवर्डस ६९ चेंडूंत १० चौकार व १ षटकारांसह ७८ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे, नेदरल्ँड्सने ४३ षटकांत ८ बाद २४५ धावा केल्या. नेदरलँड्सने शेवटच्या ९ षटकांत १०९ धावा चोपल्या. नेदरलँडची हीच खेळी आणि कर्णधाराची साजेशी झुंज संघाच्या विजयास कारणीभूत ठरली.    

टॅग्स :सचिन तेंडुलकरवर्ल्ड कप 2019द. आफ्रिका