Join us  

पाकिस्तानात खेळण्यास श्रीलंकेच्या खेळाडूंचा नकार; दहा क्रिकेटपटूंची माघार

ट्वेंटी -20 संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा आणि वन डे संघाचा कर्णधार दिमुख करुणारत्ने यांच्यासह श्रीलंकेच्या दहा प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 1:18 PM

Open in App

कोलंबो : ट्वेंटी -20 संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा आणि वन डे संघाचा कर्णधार दिमुख करुणारत्ने यांच्यासह श्रीलंकेच्या दहा प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेच्या दहा खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. 

मार्च 2009मध्ये श्रीलंका क्रिकेटपटूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात अनेक खेळाडू जखमी झाले होते आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास अनेक देशांनी नकार दिला. पण, दहा वर्षांनी श्रीलंकन संघाने सहा सामन्यांची मालिका खेळण्याची तयारी दर्शवली. पण, मलिंगासह दहा प्रमुख खेळाडूंनी मालिकेतून माघार घेतली आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळानंही खेळाडूंच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवलेला नाही. पाकिस्तानात खेळायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य खेळाडूंना दिल्याचे, श्रीलंकन मंडळाने स्पष्ट केले. 

श्रीलंका क्रिकेट संघ 27 सप्टेंबरपासून तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मलिंगा व करुणारत्नेसह थिसारा परेरा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशॅन डिकवेला, कुसल परेरा, धनंजया डी सिल्वा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल आणि दिनेश चंडिमल यांनीही पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे.      करुणारत्नेच्या जागी वन डे संघाचे नेतृत्व लाहिरू थिरीमनेकडे,तर मलिंगाच्या अनुपस्थितीत ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व दासून शनाकाकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. 2009च्या हल्ल्यानंतर श्रीलंकन संघ 2017मध्ये लाहोर येथे एक ट्वेंटी-20 सामना खेळला होता. आताच्या वन डे व ट्वेंटी-20 मालिकेनंतर श्रीलंका येथे दोन कसोटी सामने खेळण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेने 2015मध्ये पाकिस्तानात वन डे व ट्वेंटी-20 सामना खेळले होते आणि वेस्ट इंडिजही 2018मध्ये तीन ट्वेंटी-20 सामने खेळले होते. 

श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा27 सप्टेंबर –  पहिली वन डे, कराची 29 सप्टेंबर  – दुसरी वन डे, कराची 2 ऑक्टोबर  – तिसरी वन डे, कराची 5 ऑक्टोबर – पहिली ट्वेंटी-20, लाहोर7 ऑक्टोबर – दुसरी ट्वेंटी-20, लाहोर9 ऑक्टोबर – तिसरी ट्वेंटी-20, लाहोर 

टॅग्स :श्रीलंकापाकिस्तानलसिथ मलिंगा