Join us  

टीम इंडियाचे दोन्ही संघ उद्या एकाचवेळी मैदानावर उतरणार, मंगळवारी जगभरात १९ तास क्रिकेटचा थरार रंगणार!

शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे दोन संघ मंगळवारी ( २० जुलै २०२१) एकाचवेळी मैदानावर उतरणार आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 10:18 PM

Open in App

शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे दोन संघ मंगळवारी ( २० जुलै २०२१) एकाचवेळी मैदानावर उतरणार आहेत. शिखरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेत वन डे मालिका खिशात घालण्याच्या निर्धारानं दुसऱ्या सामन्यासाठी मैदानावर उतरणार आहे, तर इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या विराट अँड कंपनीच्या सराव सामन्यालाही उद्यापासून सुरूवात होणार आहे. या दोन सामन्यांव्यतिरिक्त तीन आंतरराष्ट्रीय सामनेही उद्या होणार आहेत. तामिळनाडू प्रीमिअर लीगला (TNPL) आजपासून सुरूवात झाली आणि त्याचे सामनेही क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. क्रिकेट चाहत्यांसाठी मंगळवारचा दिवस हा १९ तास क्रिकेटचा थरार घेऊन येणार आहे. ( Continues 19 hours of Cricket across the world) 

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं पहिल्या वन डे सामन्यात श्रीलंकेवर  ७ विकेट्स व ८० चेंडू राखून सहज विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेनं विजयासाठी ठेवलेले ९ बाद २६२ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं सहज पार केलं. पृथ्वी शॉ ( ४३), इशान किशन ( ५९), कर्णधार धवन ( ८६*) आणि सूर्यकुमार यादव ( ३१*) यांनी हा श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मालिकेतील दुसरा वन डे सामना मंगळवारी होणार आहे.

दुसरीकडे शाकिब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशनं ३ विकेट्स राखून झिम्बाब्वेला दुसऱ्या वन डे सामन्यात नमवले अन् तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.झिम्बाब्वेनं ९ बाद २४० धावा केल्या. प्रत्युत्तरात नाबाद ९६ धावा करताना विजय निश्चित केला. त्यानं दोन विकेट्सही घेतल्या. या मालिकेतील तिसरा वन डे सामनाही उद्या होणार आहे. 

४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या तयारीलाही टीम इंडिया उद्यापासून सुरूवात करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध कौंटी एकादश यांच्यातला तीन दिवसांचा सराव सामनाही उद्यापासून सुरू होत आहे. तामिळनाडू प्रीमिअर लीग, इंग्लंडविरुद्ध पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या लढतीही उद्या होणार आहे. त्यामुळे १९ तास क्रिकेटचा थरार अनुभवण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.

जाणून घेऊया मंगळवारी होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक ( Cricket matches happening tomorrow) 

  • झिम्बाब्वे वि. बांगलादेश, तिसरा वन डे - दुपारी १ वाजल्यापासून
  • भारत वि. श्रीलंका, दुसरा वन डे - दुपारी ३ वाजल्यापासून
  • भारत वि. कौंटी एकादश, सराव सामना - सायंकाळी ४.३० वाजल्यापासून 
  • तामिळनाडू प्रीमिअर लीग, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
  • इंग्लंड वि. पाकिस्तान, तिसरा ट्वेंटी-२० सामना, रात्री ११ वाजल्यापासून
  • वेस्ट इंडिज वि. ऑस्ट्रेलिया, पहिली वन डे, मध्यरात्री १२ वाजल्यापासून  
टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाभारत विरुद्ध इंग्लंडपाकिस्तानवेस्ट इंडिजझिम्बाब्वेबांगलादेश