Join us  

भारताची ‘एक नंबर’ कामगिरी; क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत अव्वल स्थान

भारताचे कसोटी मानांकन गुण १२२ असून, ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर ११७ गुण आहेत. तिसऱ्या स्थानावरील इंग्लंडच्या खात्यात १११ गुण आहेत. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 10:13 AM

Open in App

दुबई : भारतीय क्रिकेट संघाने रविवारी शानदार कामगिरी करताना आयसीसी कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान काबीज केले. यासह भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. याआधीच जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या गुणतालिकेतही भारताने अव्वल स्थान पटकावले होते.

सध्या न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना सुरू आहे. परंतु या सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी भारतीय संघच अव्वल राहणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला मागे खेचत अग्रस्थान पटकावले आहे. भारताचे कसोटी मानांकन गुण १२२ असून, ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर ११७ गुण आहेत. तिसऱ्या स्थानावरील इंग्लंडच्या खात्यात १११ गुण आहेत. 

एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ १२१ गुणांसह अव्वल, ऑस्ट्रेलिया ११८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. टी-२० क्रमवारीतही भारतीय संघ २६६ गुणांसह अव्वल आहे.

पुन्हा मिळविले वर्चस्व

भारतीय संघ सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका बरोबरीत सुटल्यानंतर भारतीय संघाला एका स्थानाचा फटका बसला होता. त्यावेळी कांगारुंनी पाकिस्तानला ३-० असा क्लीनस्वीप देत अव्वलस्थानी झेप घेत भारताला दुसऱ्या स्थानी ढकलले होते. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ