Join us  

T10 League : ४,४,६,६,६,६; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजानं १० चेंडूंत चोपल्या ५६ धावा; एका षटकात पाडला धावांचा धो धो पाऊस    

T10 League : ख्रिस गेल व पॉल स्टिर्लिगं यांनी पहिल्याच सामन्यात टीम अबु धाबीसह धडाकेबाज खेळी केल्यानंतर शनिवारी कर्णधार लिएम लिव्हिंगस्टोनची बॅट चांगलीच तळपली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 4:15 PM

Open in App

T10 League : ख्रिस गेल व पॉल स्टिर्लिगं यांनी पहिल्याच सामन्यात टीम अबु धाबीसह धडाकेबाज खेळी केल्यानंतर शनिवारी कर्णधार लिएम लिव्हिंगस्टोनची बॅट चांगलीच तळपली. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या इंग्लंडच्या लिव्हिंगस्टोननं नॉर्दर्न वॉरियर्स संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. टीम अबु धाबी संघाच्या एकूण धावांपैकी निम्म्या धावा लिव्हिंगस्टोननं एकट्यानं कुटल्या. त्यानं जोश लिटलच्या एका षटकात ३५ धावा जोडताना संघाच्या धावसंख्येत मोठी भर घातली.

प्रथम फलंदाजी करताना टीम अबु धाबीनं १० षटकांत ५ बाद १३२ धावा केल्या. मागील सामन्यातील नायक पॉल स्टिर्लिंग ( ०) व ख्रिस गेल (९) आज अपयशी ठरले. पण, सलामीवीर फिल सॉल्टनं १५ चेंडूंत २९ धावांची खेळी केली. कर्णधार लिव्हिंगस्टोननं २३ चेंडूंत नाबाद ६८ धावा केल्या. त्यानं २ चौकार व ८ षटकार अशा ५६ धावा फक्त १० चेंडूंत जोडल्या. जोश लिटलनं त्याच्या पहिल्या षटकात १ धाव देत १ विकेट घेतली होती, परंतु त्यानं टाकलेल्या दुसऱ्या षटकात लिव्हिंगस्टोननं २ चौकार व ६ षटकार खेचले व तीन Wide चेंडूंमुळे त्या षटकात ३५ धावा जोडल्या गेल्या.  प्रत्युत्तरात वॉरियर्स संघाला ७ बाद १११ धावा करता आल्या. केनाल लुईस ( ३५) व कर्णधार रोवमन पॉवेल ( ४२) हे सोडल्यास वॉरियर्सचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. मर्चंट डी लँग्ने यानं पहिल्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या आणि आज त्यानं ६ धावा देत २ बळी टिपले. डॅनी ब्रिग व नवीन-उल-हक यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :टी-10 लीगराजस्थान रॉयल्सइंग्लंड
Open in App