कोलकाता : दौ-याच्या सलामीला आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्याची कसर भरून काढण्यासाठी भारतीय संघ आज गुरुवारी ईडन गार्डनवर दमदार विजयाचे लक्ष्य ठेवून खेळणार आहे. फिरकीपटूंनी आॅस्ट्रेलियाला पुन्हा एकदा फिरकीच्या जाळ्यात अडकवावे, अशी कर्णधार कोहलीची अपेक्षा असेल. या सामन्यावर पावसाचे सावट राहण्याचे भाकीत वर्तविण्यात आल्यामुळे चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडू शकते.
कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांचा फिरकी मारा खेळून काढणे आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जड गेले होते. त्यामुळे मालिकेत वाटचाल करताना दोघांच्याही मा-यात सातत्य राहावे, असे भारतीय संघ व्यवस्थापनाला वाटते. यादवचे चेंडू पाहुण्या फलंदाजांना समजलेदेखील नाहीत. दुसरीकडे चहलचा मारा खेळणेसुद्धा त्यांना जड गेले. यावर तोडगा म्हणून सरावादरम्यान पाहुण्यांनी स्थानिक फिरकीपटूंचा मारा तासन्तास खेळून काढला.
पावसाच्या व्यत्ययात झालेल्या पहिल्या वन डेत २१ षटकांत १६४ धावांचे लक्ष्य गाठणाºया आॅस्ट्रेलिया संघाने ३५ धावांत चार गडी गमावले. नंतर चहल-यादव यांनी फलंदाजांना अलगद अडकविताच भारताने सामना २६ धावांनी जिंकला. पाहुण्यांसाठी सर्वांत मोठा धोका ठरला हार्दिक पांड्या. आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये चौथ्यांदा षटकारांची हॅट्ट्रिक ठोकणाºया हार्दिकने धोनीसोबत ११८ धावांची भागीदारी केलीच, शिवाय स्वत: ६६ चेंडूंत ८३ धावांचे योगदान दिले.
२०१५च्या आयपीएलपासून हार्दिक दिवसेंदिवस परिपक्व होत चालला आहे. मधल्या षटकांत गोलंदाजीही करीत असल्याने अष्टपैलू खेळाडूची जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज झाला. चेन्नईत त्याने मारलेल्या फटक्यांचा धसका आॅस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झंपा याने नक्कीच घेतला असावा.
आॅस्ट्रेलियाचे मॅक्सवेल, ट्रॅव्हिस आणि अॅश्टन हे फिरकी गोलंदाज भारतीय फलंदाजांचे आव्हान
कसे स्वीकारतात, हे पाहणे
रंजक ठरणार आहे. हेडने डावाची सुरुवात केल्यास मार्कस् स्टोयनिसला चौथ्या स्थानावर पाठविले जाईल. अष्टपैलू जेम्स फॉल्कनरकडून पाहुण्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. (वृत्तसंस्था)
>पावसामुळे सराव हुकला
भारतीय संघ पावसामुळे सलग दुसºया दिवशी सरावास मुकला. आॅस्ट्रेलियाला देखील नेटवर सराव करता आला नाही. सरावासाठी उभय संघ स्टेडियममध्ये दाखल झाले होते. पण पावसाच्या व्यत्ययामुळे खेळाडू सराव करू शकले नाहीत.
भारतीय खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्येच व्हॉलिबॉल खेळण्याचा आनंद लुटला. खेळाडू हॉटेलवर परतल्यानंतर मात्र मैदानावर ऊन पडले होते. यादरम्यान कॅबचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मैदानाचे निरीक्षण करीत काही सूचना केल्या.
च्त्याआधी कोहली, रवी शास्त्री आणि भारत अरुण यांनीही खेळपट्टीचे निरीक्षण केले. खेळपट्टीवर थोडे गवत आहे. आठवडाभराआधी याच खेळपट्टीवर बंगालचा स्थानिक सामना खेळविण्यात आला होता.
>‘भारताला आव्हान देण्याची आमच्यात क्षमता’
संघात अनेक प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असल्याने भारताला आव्हान देण्याची क्षमता असल्याचे मत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने व्यक्त केले. विश्व चॅम्पियन या नात्याने प्रतिभावान खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या बळावर मालिकेत पुनरागमन करण्याचे संकेत त्याने दिले. चेन्नईत टी-२० सारखी स्थिती होती. स्मिथ म्हणाला, ‘‘माझा खेळाडूंवर भरवसा असल्याने पुढील काही सामन्यांत भारताला भक्कम आव्हान देऊ.’’
शंभरावा सामना : स्टीव्ह स्मिथचा हा शंभरावा वन डे असेल. लढतीच्या पूर्वसंध्येला तो म्हणाला, ‘‘खेळातील अनुभवानुसार शिकण्याची वृत्ती वाढते. २०१५च्या विश्वचषकात उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध झळकावलेले शतक अविस्मरणीय होते. ४२ सामन्यांत संघाचे नेतृत्व करताना मी बरेच काही शिकलो.’’
>वॉर्नरला कुठल्याही क्षणी बाद करू शकतो : कुलदीप
आॅस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला कुठल्याही क्षणी बाद करण्याचा विश्वास युवा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने व्यक्त केला. हरियाणाचा २२ वर्षांच्या कुलदीपने धर्मशाळा येथे पदार्पणाच्या कसोटीत वॉर्नरचा बळी घेतला होता. चेन्नई वन-डेतही वॉर्नरची पुन्हा शिकार केली. तो म्हणाला, ‘माझा सामना करताना वॉर्नर दडपणात असतो. त्यामुळेच मी कुठल्याही क्षणी त्याला बाद करू शकतो, असा विश्वास वाटतो. स्टीव्ह स्मिथ याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे मात्र तितकेच कठीण आहे. तो चेंडूचा आधीच वेध घेतो. यजुवेंद्र चहलच्या सोबतीने गोलंदाजी केल्याचा भरपूर लाभ झाला आहे.’
>उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.
आॅस्ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वार्नर, हिल्टन कार्टराइट, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), नाथन कूल्टर नाईल, पॅट कमिन्स, जेम्स फॉल्कनर, पीटर हॅन्डसकोम्ब, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, अॅडम झम्पा, केन रिचर्डसन, मार्कस स्टोयनिस आणि अॅरोन फिंच.